मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणे हा लोकशाहीवरच मोठा अन्याय, आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज: हर्षवर्धन सपकाळ.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन मध्ये “लोकशाही वाचवा निर्धार सभा” संपन्न..
मुंबई, दि. २ जुलै २६
देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क व अधिकार नाकारले जात आहेत, म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद करा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मिनाक्षी नटराज यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती. या सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणा प्रभारी मीनाक्षी नटराजन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तेलंगाणाचे सहप्रभारी सचिन सावंत, राष्ट्रीय प्रवक्ते, माजी आमदार चरणजित सप्रा, ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन, तिस्ता सेटलवाड, चित्रा राणे, जयंत दिवाण आदी उपस्थित होते..
यावेळी मार्गदर्शन करताना मिनाक्षी नटराजन म्हणाल्या की, माझा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केला हा महत्वाचा प्रश्न नाही तर माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी एक मोठे षडयंत्र रचले होते. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांनी तिसरा उमेदवार उभा केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. आमच्या तक्रारीची दखलही न घेता निर्णय देण्यात आला. माझ्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन मला पुरेसा वेळ व संधी दिली नाही पण झारखंडमधील एका उमेदवाराला मात्र त्याच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला, आमचे ऐकूणही घेतले नाही. यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व लोकांनी आवाज उठवला. माझ्यासाठी राज्यसभा नाही तर जनसभा अधिक महत्वाची आहे, असेही नटराजन म्हणाल्या.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करून नटराजन यांच्यावर अन्याय केला असे नाही तर लोकशाहीवरच अन्याय केला आहे. देशात आज करो या मरोची परिस्थिती असून आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची गरज आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी हे दोनच विचार आहेत आणि लोकशाही व संविधान वाचवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..
विधान परिषदेतील काँग्रेसच गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यावेळी म्हणाले की, मागील १२ वर्षापासून देशातील परिस्थिती बदलेली आहे, लोकशाही व्यवस्था धोक्यात आलेली आहे. सरकार विरोधकांचा आवाज दडपून टाकत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे म्हणून लोकशाही वाचवणे हे सर्वात महत्वाचे आहे, या लढाईत १५ ते २५ या वयोगटातील तरुण वर्गाला सहभागी करून घेतले पाहिजे, या तरुणाईची लोकसंख्या तब्बल ५४ टक्के आहे म्हणून या लढाईत या वर्गाचा सहभाग असणे महत्वाचे आहे. आज इतिहासाची मोडतोड केली जात आहे, हा चुकीचा इतिहास पसरवणे रोखले पाहिजे. सोशल मीडिया ही मोठी ताकद असून तीचा जास्तीत जास्त वापर करा, असे आवाहनही सतेज पाटील यांनी केले.
तुषार गांधी यावेळी म्हणाले की, देशातील आजची परिस्थिती ब्रिटीश राजवटीपेक्षा वाईट आहे. सध्या वैचारिक गुलाम बनवले जात आहे, या सरकार विरोधात रस्त्यावरची मोठी लढाई लढावी लागणार आहे. सरकारविरोधात मोठा लढा निर्माण केला तरच सत्तेला हादरे बसतील पण मोठा विरोधी आवाजच होत नाही म्हणून सरकार त्याचा फायदा उठवत आहे. संविधानाला विरोध हा काही आता केला जात नाही तर संविधान निर्माण होत असल्यापासूनच त्याला विरोध केला जात होता. सत्ताधारी भाजपा संविधानाला सशक्त करणाऱ्या संस्थांवरच घाला घालत आहे, या संस्था टिकल्या तरच संविधान टिकेल. सरकारच्या नाकात दम आणला पाहिजे अशा आंदोलनाची आज गरज आहे आणि तसे आंदोलन झाले पाहिजे, असे तुषार गांधी म्हणाले..
यावेळी उल्का महाजन, तिस्ता सेटलवाड यांनीही मार्गदर्शन केले.

