मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे.
या घटनेप्रकरणी माहिती देताना मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मी कोणाची पाठराखण करत नाहीये, अश्विनी भिडे असोत वा मी असो आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची ऑर्डरही मी सोबत आणली आहे. निलंबित केलेल्यांमध्ये धनाजी हेर्लेकर सहायक आयुक्त, दीपक चौघुले दुय्यम अभियंता परीरक्षण, अभिजीत चौघुले कनिष्ठ अभियंता, उत्तम पाटील सहायक अभियंता या चार अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याबाबतही मी पालिका प्रशासनाला सांगतले असल्याचे महापौर रितू तावडे म्हणाल्या.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ एका खासगी कंत्राटदाराकडून देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामासाठी रस्त्यावरील 25 फूट खोल मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते, मात्र आजूबाजूला कोणतेही सुरक्षेचे बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. भरपावसात मोबाइलवर बोलत चाललेले साकीनाका येथील यादव नगरचे रहिवासी असलेले 60 वर्षीय अस्लम इसाक शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते थेट 20 ते 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडले. यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व शोध आणि बचाव कार्याला सुरुवात झाली.
मृतदेह पुढच्या मॅनहोलमध्ये सापडला
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल (MFB), पोलीस आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला शोधकार्यादरम्यान त्यांची केवळ छत्री आणि चप्पल सापडली होती. पाण्याचा वेग जास्त असल्याने ते वाहून गेले होते. अखेर त्यांचा मृतदेह पुढच्या मॅनहोलमध्ये सापडल्याची माहिती स्थानिक आमदार दिलीप लांडे (ज्यांच्या मतदारसंघात ही घटना घडली) यांनी दिली.
प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया
या गंभीर घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात मॅनहोल उघडे ठेवणे किती धोकादायक आहे, याची प्रचिती वारंवार येत असतानाही मॅनहोल उघडे कसे ठेवले जाते? तसेच तिथे बॅरिकेड्स का लावले नाहीत? असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या (UBT) नेत्या श्रद्धा जाधव यांनी उपस्थित केला. नालेसफाईचे टेंडर उशिरा काढण्यात आले, कामचुकार ठेकेदार आले नाहीत आणि मिठी नदीसह इतर नाल्यांची सफाई पूर्ण झाली नसल्याचा आरोपही त्यांनी करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले.
महापौरांनी दिली कारवाईची ग्वाही
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत, प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे मान्य केले. “मी श्रद्धा जाधव यांच्या मताशी सहमत आहे. इतक्या पावसात मॅनहोल उघडण्याचे कारण काय? वॉर्ड ऑफिसरलाही हे काम सुरू असल्याची माहिती नव्हती,” असे महापौर म्हणाल्या. वर्क ऑर्डर नसताना खासगी कंत्राटदाराने काम कसे सुरू केले आणि बॅरिकेड्स का लावले नाहीत, याची सखोल चौकशी केली जाईल. आम्ही ‘अॅक्शन मोड’वर असून या मॅनहोल प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दुर्घटनांची मालिका सुरूच; महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला होता अधिकारी!
मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या दुर्घटनांची मालिका सुरू आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच महापौर रितू तावडे या स्वतः शहरातील नाल्यांची आणि पावसाळापूर्व कामांची पाहणी करत असताना, त्यांच्या दौऱ्यातच एक पालिका अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये (खड्ड्यात) पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचे साकीनाक्याच्या ताज्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर भलेमोठे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला होता. एकीकडे प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या अशा जीवघेण्या हलगर्जीपणामुळे सामान्य मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा संताप सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

