परभणी-परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. शनिवार असल्याने मंदिरात कीर्तन आणि महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, त्याच वेळी हा सभामंडप कोसळला. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले.
यशवाडी देवस्थान येथे दर शनिवारी जिल्हाभरातून आणि शेजारच्या भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. आज शनिवारी देखील सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य मंदिरासमोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच अचानक दुपारी सभागृहाचे छत कोसळले. छत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि भाविकांमध्ये पळापळ सुरू झाली.
दरम्यान, यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचावकार्य अडीच तासानंतर पूर्ण झाले असून, सर्व ३२ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. ३२ पैकी ७ जणांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन विभाग पाथरी, मानवत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय पथक महापालिका परभणी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे बचावकार्य पूर्ण करण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र यशवाडी संस्थान येथे बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचे पिलर कोसळून झालेल्या दुर्घटनेवर खासदार संजय जाधव यांनी दुःख व्यक्त केले आहे. शनिवारी दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमध्ये या घटनेत सुमारे ३० ते ४० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले. जखमी भाविकांना तातडीने उपचार मिळावेत आणि ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना व्यक्त करत प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबवून सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही संजय जाधव यांनी केले आहे.
मानवत तालुक्यातील यशवाडी संस्थान येथे मारोती मंदिराच्या सभामंडपाचे पिलर कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी असल्याचे म्हटले. दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून काही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. तसेच जखमींना तातडीने सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर मदतकार्य राबविण्याच्या सूचना दिल्याचे सांगत या कठीण प्रसंगी बाधित भाविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास डॉ. राहुल पाटील यांनी दिला.
अचानक छत अंगावर कोसळल्यामुळे 30 पेक्षा जास्त भाविकांना बाहेर पडता आले नाही आणि ते या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे आपल्या संपूर्ण पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
यशवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमी भाविकांना तत्काळ उपचार मिळावेत आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती, असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले आहे.

