पुणे : महाविकास आघाडीच्या प्रचारात जातीवादी मुद्दे उपस्थित करून नरेंद्र मोदी, आरएसएसचा पराभव करण्यासाठी देशभरातून मुस्लिमांना मतदानात आणा असे सांगितले जात आहे. कसब्याची निवडणूक आता स्थानिक मुद्द्यावर राहिलेली नाही.तर ती राष्ट्रीय विचारांची निवडणूक झाली असून, कसबा हा हिंदूंचाच आहे हे मतदार दाखवून देतील, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित महात्मा फुले मंडईतील सभेत फडणवीस बोलत होते.रिपाईचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हेमंत रासने, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, कुणाल टिळक आदी यावेळी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही निवडणूक लागल्याने त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी रासने निवडणुकीत उभे आहेत. गिरीश बापट यांनी आजारी असूनही मतदारांना केलेल्या आवाहनावर आपण ही निवडणूक नक्कीच जिंकू. या निवडणुकीत भाजपवर हा समाज नाराज, तो समाज नाराज असा प्रचार करण्याचा प्रयत्न झाला.पण शरद पवार यांच्या बैठकीत मुस्लीम नेते जातीवादी टिपणी करत ‘मोदींना, आरएसएसला हरविण्याकरता देशभरातून आम्ही मुसलमानांना आणू, मेलेल्या मुसलमान देखील मतदानाला आणू हे सांगत आहे.त्यामुळे आता ही लढाई रासने धंगेकर राहिलेली नाही तर राष्ट्रीय विचारांची झाली आहे. पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराला धंगेकर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देणार का असा प्रश्न फडणवीस यांनी केला. यावेळी आठवलेंच्या कविता करत केलेल्या भाषणाला टाळ्या, शिट्या वाजवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
पुण्याच्या विकासावर फडणवीस म्हणाले
- रिंगरोड, विमानतळाचा विस्तार ही कामे करत आहोत
-सगळ्या समाजांना एकत्रित घेऊन विकासाचा रथ पुढे नेणार - मेट्रोचे नेटवर्क, नदी स्वच्छतेचा व सुशोभीकरण प्रकल्पामुळे पुण्याचा चेहरा बदलणार.
- देशामध्ये सर्वाधीक इ बसेस पुण्यामध्ये असल्याने केंद्र सरकारकडून या मॉडेलचे कौतुक
- विकासातून परिवर्तन घडविताना कसब्यात भाजपचा आमदार हवा