पुणे- भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते हुतात्मा बाबूगेणू स्तंभ, तुळशीबाग पर्यंत ‘क्रांतीज्योत यात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले.
क्रांतीज्योत यात्रेचा मंडई येथील हुतात्मा बाबूगेणू स्तंभास पुष्पहार अर्पण करून समारोपीय भाषणात शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘दुसऱ्या महायुद्धात भारताचा पाठींबा घेऊन, भारतीय जवानांचं बलिदान आपल्या स्वार्थासाठी करून घेणाऱ्या ब्रिटीश सरकारला आता काहीही केल्या देशातून हद्दपार करायचं असा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली घेतला. संपूर्ण स्वराज्य या भावनेने प्रेरित होऊन इंग्रजांना भारतातून हुसकावून लावायचं असं ठरल्यानंतर महात्मा गांधीनी ‘‘करेंगे या मरेंगे’’ आणि ‘‘चले जाव’’ या दोन क्रांतीकारी घोषणा दिल्या. पुढे याच घोषणेनं सारा भारत ढवळून निघाला आणि देशभरात इंग्रजांविरोधात असंतोष वाढत गेला. देशभरात इंग्रजांविरोधात आंदोलनं होऊ लागली. मात्र ही आंदोलनं शांततापूर्ण मार्गाने असावी असं गांधीजींचं म्हणणं होतं. अशात काही आंदोलनांना हिसक वळणं लागली.
हे असं काही घडणार आहे याची कुणकुण इंग्रजांना लागली आणि ०९ ऑगस्ट १९४२ चं आंदोलन होऊ नये किंवा त्याची सुरूवात होऊ नये यासाठी इंग्रजांनी महात्मा गांधींसह जवळपास सर्वच बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेस इथं ठेवण्यात आलं होतं आणि इतर बड्या नेत्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आलं होतं. बडे नेतेच नसल्याने नऊ ऑगस्टचा प्लान फसणार अशा भ्रमात इंग्रज होते. मात्र त्याच वेळेस मुंबईच्या गवालिया टँक इथं तरूण तडफदार नेत्या अरूणा असफअली यांनी तिरंगा फडकावत भारत छोडोचा नारा दिला आणि त्याचं लोण मग देशभर पसरलं. इंग्रजांच्या भ्रमाचा भोपळा ०९ ऑगस्ट १९४२ साली फुटला आणि हे आंदोलन इंग्रजांना आवरता आलं नाही. त्याआधी या आंदोलनाची आखणी ०४ ऑगस्ट १९४२ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली होती.
८ ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात या प्रस्तावाला संमत करण्यात आलं. शेकडो हुतात्म्यांनी आपल्या बलिदानाने मातृभूमीची सेवा केली आणि त्याचं हे बलिदान व्यर्थ गेलं नाही. या आंदोलनासमोर इंग्रजांना हात टेकावे लागले आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. या आंदोलनात आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या हुतात्मांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.’’
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आबा बागुल, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, बाळासाहेब मारणे, रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, कैलास गायकवाड, द. स. पोळेकर, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, NSUI अध्यक्ष अभिजीत गोरे, सुनिल शिंदे, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, लतेंद्र भिंगारे, राजू ठोंबरे, अजित जाधव, रमेश सोनकांबळे, सुजित यादव, हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, विशाल जाधव, नितीन परतानी, प्रकाश पवार, गुलामहुसेन खान, बळीराम डोळे, संदिप मोकाटे, उषा राजगुरू, अनुसया गायकवाड, रवि ननावरे, समिर शेख, रवि आरडे, अमर गायकवाड, अक्षय शिंदे, सुरेश नांगरे, वाहिद निलगर, देवीदास लोणकर, गणेश गुगळे, मतीन शेख, योगीराज नाईक, अशोक लोणारे, अजय खुडे, रामदास केदारी, महेश विचारे, राजेंद्र मराठे, कृष्णा नाखते आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

