- ‘रिपाइं’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचनभवन, महानगरपालिकेकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा
पुणे : नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला. या पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचनभवन आणि पुणे महानगरपालिका असा धडकला.
‘रिपाइं’ कार्यकर्त्यांसमवेत शेकडो पूरग्रस्त नागरिक यामध्ये भरपावसात सहभागी झाले. तीनही विभागांशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन देत पूरग्रस्तांना त्वरित २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी ‘रिपाइं’च्या वतीने करण्यात आली. ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, ऍड. मंदार जोशी, माजी नगरसेवक अशोक कांबळे, महेंद्र कांबळे, यशवंत नडगम, बाबुराव घाडगे, वीरेन साठे, निलेश आल्हाट, तानाजी ताकपेरे, बसवराज गायकवाड, सुनील जाधव, शाम सदाफुले, उमेश कांबळे, अमोल खंडागळे, स्नेहा पवार, सुधामती चौधरी, विनोद टोपे, संदीप धांडोरे, अविनाश कदम, गौतम कदम, शिवाजी उजागरे, नाना ढेपे, अकबर शेख, फिरोज खान, शमसुद्दीन शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय सोनवणे म्हणाले, “पाण्याचा विसर्ग करताना पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त पुणे आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयाच्या अभावी पुणे शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधीत झाली आहेत. शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. येत्या काळातही नदीकाठच्या वस्त्यांवर पुराची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत.”
बाळासाहेब जानराव म्हणाले, “कोणतीही पूर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग केल्याने ही पूरपरिस्थिती उद्भवली. त्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांचा विसर्ग खडकवासला धरणात होतो. त्यामुळे ही टांगती तलवार कायम असून, याला पर्याय न दिल्यास १९६२ सारखी पूरपरिस्थिती येऊ शकते. हे टाळण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करून रायगडच्या दिशेला पाणी सोडण्याचा विचार व्हावा. जेणेकरून खडकवासला धरणावर ताण येणार नाही.”
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “पुण्यात झालेल्या जोरदार पवसामुळे मुळा-मुठा नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. परिणामी, अनेकांचे संसार उघड्यावर पडले. लाखों रुपयांचे नुकसान झाले. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी. प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत त्वरीत मिळावी.”
परशुराम वाडेकर म्हणाले, “नदीसुधार योजनेमुळे नदीपात्राची रूंदी कमी झाली आहे. मेट्रो मार्गाचे बांधकाम, नदीमध्ये राडारोडा टाकण्यासह मनपाची विविध विकासकामे, नदीपात्रातील अतिक्रमणे, नाल्यावरील अतिक्रमणे यामुळे पाणी नागरी वस्तीत शिरत आहे. पूर्वी ९० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्यावर येणारा पूर आता २८ हजार क्युसेस पाणी सोडल्यावर येतो, हे गंभीर आहे.”
शहरामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. वाहतुककोंडीमुळे पुणेकर हवालदिल झाले आहेत. तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच पूरग्रस्तांना शासनाने त्वरित मदत करावी, अशी आग्रही मागणी सुनीता वाडेकर यांनी केली. या आक्रोश मोर्चात शांतीनगर, आदर्शनगर, बोपोडी, खडकी, येरवडा आणि इतर भागांतील पूरग्रस्तांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी झाले होते.
आक्रोश मोर्चाच्या ठळक मागण्या:
- पुरग्रस्तांना झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई द्यावी.
- प्रत्येक कुटूंबास २५,०००/- रुपयांची तातडीची मदत करावी.
- पूरस्थिती हाताळण्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे.
- पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत
- पुररेषा (रेडलाईन, ब्लू लाईन) नव्याने आखण्यात यावी.
- आपत्कालीन व्यवस्थापन समिती सक्षम करावी
- सर्वसामान्य माणसापर्यंत माहिती पोहचविण्याची व्यवस्था करावी.
- पुरग्रस्तांचे खोटे पंचनामे करणारे अधिकारी, खोट्या लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करावी.
- पाण्याचा विसर्ग करण्याला पर्यायी मार्ग तयार करावा.
- शहरातील वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी समन्वय समिती करावी
– ड्रेनेज लाईनचा व्यास वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
नदीसुधार प्रकल्पाचा पुनर्विचार करू : आयुक्त
‘रिपाइं’च्या या आक्रोश मोर्चाला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, नदीसुधार प्रकल्पाचा पुनर्विचार करू. तसेच नव्याने ब्ल्यू लाईन व रेड लाईन निश्चित करणार आहोत. नाले आणि नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु केलेली असून, लवकरच पाणी जाण्याचे मार्ग खुले होतील. कॅनॉलमधून पाणी ओसंडणे थांबविण्यासाठी फुरसुंगीपर्यंत जमिनीखालून पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरच होईल.
पूरग्रस्तांना दोन-दिवसांत मदत मिळेल : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले की पूरग्रस्तांना पैसे देण्यासाठी शासनाकडे मागणी केली असून, दोन-तीन दिवसांत मदतीची वाटप सुरु होईल. ज्यांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांचे पंचनामे नव्याने करून त्यावर कारवाई केली जाईल. कोणाही पुरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सध्या अन्नधान्य किट वाटप सुरु असून, त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरु असून, लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिवसे यांनी दिले.