मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावरून सुरू असलेल्या सस्पेन्सचा अखेर पडदा फासला आहे. स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवार व्हावे, अशी भूमिका वारंवार मांडली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाऐवजी पक्षातील आक्रमक चेहरा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी 2020 साली विधान परिषदेवर प्रवेश केला होता आणि त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू असताना, ठाकरेंनी अंबादास दानवेंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यांची जागा शिवसैनिकाला दिली – अंबादास दानवे
विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “उद्धव ठाकरे साहेबांचे मी आभार मानतो. पक्षाने शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. उद्धव ठाकरेंनी सभागृहात यावे, अशी आमची सगळ्यांची भूमिका होती. परंतु, उद्धवजींनी एका सामान्य सैनिकाला त्यांची जागा सभागृहात दिली. उद्धव ठाकरेंनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करून, मला उमदेवारी देण्याचा निर्णय घेतला असे वाटते. मी याआधीही सभागृहात होतो. आता एका गॅपनंतर पुन्हा सभागृहात येतोय,” असे अंबादास दानवे म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी नाकारल्यामुळे आता महाविकास आघाडीची रणनीती काय असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीतवेळी ठाकरे गटाचे शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे विधान परिषदेला उद्धव ठाकरे जो कोणी उमेदवार देतील त्याला आमचा पाठिंबा राहील, असे आमच्याकडून सांगण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे आता काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य आहे का? काँग्रेसकडून कोणती भूमिका घेतली जाते? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेतील फूटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. अंबादास दानवेंना आता दुसऱ्यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली.
महायुतीचे किमान 8 उमेदवार निवडून येण्याची शक्यता
विधान परिषद निवडणुकीच्या गणिताकडे पाहिले, तर एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड दिसत आहे. भाजपकडे 131 आमदार, शिवसेना शिंदे गटाकडे 57, तर अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. या बळावर महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांचा फक्त एकच उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो.
अंबादास दानवे यांचा सविस्तर परिचय
नाव – अंबादास एकनाथराव दानवे
जन्म – दिनांक 08 डिसेंबर 1970, छत्रपती संभाजीनगर
पत्ता – ‘भवानीकृपा’ अजबनगर-संभाजीनगर 431001
ई मेल – ambadasdanve79@gmail.com
शिक्षण
एम.ए. जनसंवाद व वृत्तपत्रविद्या
एम.ए. योगशास्त्र
एम.ए. समाजशास्त्र
विधी शाखा व्दितीय वर्ष पूर्ण
राजकीय जबाबदारी
1998 ते 2001 – उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, छत्रपती संभाजीनगर.
2000 – सदस्य महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर (नगरसेवक).
2000 ते 2001 – सभागृहनेता, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर.
2004 पासून – जिल्हाप्रमुख, शिवसेना, छत्रपती संभाजीनगर.
2014 – गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली (पराभूत).
2019-2025 – संभाजीनगर – जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड.
2024 पासून – शिवसेना नेता – नियुक्ती.
2021 पासून – संचालक संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
2022 ते 2025 – विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद.
इतर जबाबदारी
मातृभूमी प्रतिष्ठान (सामाजिक संस्था), छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष.
संपर्कप्रमुख – अखिल भारतीय वारकरी महामंडळ, छत्रपती संभाजीनगर.
जिल्हा हँडबॉल संघटना, छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष.
कबड्डी संघटना, छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष.
जिल्हा योग संघटना, छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष.
संचालक – स्वामी समर्थ प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर (वाळूज).
कर्णपुरा देवी मंदिर संस्थान- छत्रपती संभाजीनगर, इ. स. १९९७ पासून – अध्यक्ष.
दत्तधाम सूर्यकुंड सुलीभंजन पर्वत संस्थान – रत्नपूर – अध्यक्ष.
विशेष
इ. 12 वी परीक्षा मार्च 1988 मराठवाडा विभागात सहाव्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत उत्तीर्ण.
खासदार संजय राऊत ‘रोखठोक’ अभिव्यक्तीः एक संवादशास्त्रीय अभ्यास या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात लघुप्रबंध सादर.
बर्कले विद्यापीठ – कॅलिफोर्निया ‘अमेरीका’ मान्यताप्राप्त हैद्राबाद पर्लओनजीक विद्यापीठ सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट देऊन सन्मान.
विविध आंदोलने
आंतकवाद विरोधी सप्ताहाचे आयोजन – 1 जून 2006.
छत्रपती संभाजीनगरात वंदेमातरम सभागृहासाठी 31 वेळा आंदोलन.
संभाजीनगर नामांतरासाठी सातत्याने आंदोलने व तुरुंगवास.
जायकवाडीत हक्काचे पाणी मिळावे यासाठी आंदोलन.
शेतकऱ्यांसाठी सातत्याने आंदोलने.
छत्रपती संभाजीनगरात ‘लबाडांनो पाणी द्या’ लागोपाठ 34 दिवस आंदोलन व भव्यमोर्चा 13 एप्रिल ते 16 मे 2025.
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ” क्या हुवा तेरा वादा” आंदोलन 5 ते 12 मे 2025.
सातत्याने ‘ पीक विमा मदत केंद्र’ सुरू करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
उपक्रम
शिवसैनिकांसाठी ‘शिवकवच’ विमा योजना राबवली.
दुष्काळी स्थितीत ‘ गंभीर दुष्काळ – खंबीर शिवसेना’ उपक्रमात शेतकऱ्यांना चारा वाटप, पाणी टाकी व ठिकठिकाणी टँकरने पाणीपुरवठा, शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटप, शेती अवजारे मिळवून देणे, चारा छावण्या, मोफत बियाणे, सामुदायिक विवाह उपक्रम राबविले.
शिवजलक्रांती माध्यमातून पाझर तलावंतुन गाळ काढून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचविले.
पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविली – 2013-2014 / 2015-2016.
जिजाऊ कवच योजना – माता व बालमृत्यु रोखण्यासाठी उपक्रम.
बेवारस प्रेतांना विधीवत अंत्यसंस्कारासाठी ‘शवदाह योजना’ राबविली (सन 2012 पासून)
कोवीड काळात 35000 कुटुंबांना अन्नधान्य वाटप / 2500 रुग्णांना अन्नपुरवठा.
छत्रपती संभाजीनगरात 2017 पासुन सतत स्वयंपुर्ण ” शिवभोजन केंद्र ” अंतर्गत गोरगरिबांना मोफत भोजन.
गरजूंच्या मदतीसाठी संभाजीनगरात कार्डीयाक रुग्णवाहिका.
सांस्कृतिक – सामाजिक कार्य
मागील 27 वर्षांपासून (1998) श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन.
प्रतिवर्षी ‘हर हर महादेव कावड’ यात्रेचे आयोजन.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परिक्षेच्या धर्तीवर ‘सामान्य ज्ञान स्पर्धा’, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, तुरुंगातील कैद्याचे पाल्य, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी सन 2012 ते 2025 या काळात ” सूर्योदय शिष्यवृत्ती ” (18000 विद्यार्थी).
पाश्चिमात्य ‘व्हॅलेंटाईन डे’ ऎवजी सातत्याने ‘मातृपितृ पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन.
विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवात ‘ गणपती अथर्वशीर्ष’ पठणाचे आयोजन.
2011 पासून नवरात्रीत नवरंग महोत्सवाचे आयोजन.
महिलांना शेकडो शिलाई मशिन, अपंगांना सायकल वाटप, प्रतिवर्षी 9 कर्तुत्ववान महिलांना पुरस्कार.
26 जुलै 2018 रोजी चित्र रंगवा स्पर्धेचे आयोजनातून विश्वविक्रम – एकाचवेळी 52500 विद्यार्थ्यांचा सहभाग.
कबड्डी – क्रिकेट, हॉलीबॉल स्पर्धेचे सातत्याने आयोजन.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बँकेच्या परिक्षेमध्ये सहभाग वाढावा यासाठी सतत बँक भरती प्रशिक्षणांचे आयोजन.
विरोधी पक्षनेता (कार्य)
जनाधिकार – तुमच्या हक्काचा जनता दरबार उपक्रम.
महाराष्ट्रातील 12 जिल्हयात ऑन द स्पाट प्रश्नांची सोडवणूक.
अकोला व शेवगाव दंगलग्रस्त भागात भेट.
मेळघाटात मुक्काम करून अनेक आदिवासी पाड्यांना भेटी – आदिवासी बांधवांशी संवाद – हंगतपुरी, शिरुर येथे संवाद.
दरडग्रस्त हशीळवाडी, तळीये गांवांना प्रत्यक्ष भेट.
नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, पिंपरी चिंचवड, धाराशिव, नाशिक, येथील रुग्णाच्या सुखसोयीशी वैद्यकीय महाविद्यालयांना भेटी.
शासनाच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन.
गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागांना भेटी.
दुष्काळ, अतिवृष्टी झाल्यावर सातत्याने शेतकऱ्यांच्या बांधावर.

