संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा, तुषार गांधींची डेक्कन पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार
पुणे : पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली.मागील काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली. यावेळी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी, अॅड. असीम सरोदे, अन्वर राजन हेदेखील उपस्थित होते.
तुषार गांधी म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी यापूर्वी अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. महात्मा गांधी यांच्याबद्दलदेखील विधान केले. पण आता महात्मा गांधी यांच्या आईबद्दल केलेले विधान ऐकल्यावर खूप दुःख झाले आहे. त्यानंतर राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये संभाजी भिडेंविरोधात गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी कडक पावलं उचलू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहे.
“तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कडक शब्दात सांगितलं आहे की या तक्रारीची दखल घेऊन तपास करु योग्य कारवाई करु. न्यायावर आमचा विश्वास आहे. मात्र त्यांचे पाय कोणी बांधून ठेवले आहेत का?, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. त्यामुळे न्यायालयाच्या दरवाज्यात जाण्यासाठीची पहिली पायरी तक्रार देऊन ओलांडली आहे,” असं तुषार गांधी म्हणाले.
गांधी घराण्यातील स्त्रियांचा अपमान आणि बेआब्रू केली आहे. ही गांधी घराण्यातील सगळ्याच पिढ्यांची बेआब्रू आहे. त्यामुळे बेआब्रू करणे, महिलांचा अपमान करणे, लोकांच्या मनात अनेक गोष्टींबाबत भेदभाव निर्माण करणे, गुन्हेगारी स्वरुपाचा वक्तव्य करणे आणि संगनमताने अशाप्रकारे कृत्य करणे त्यासोबतच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य या सगळ्या कलमांअंर्तगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार नोंदवण्यात आली आहे, असं सरकारी वकील असिम सरोदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर म्हटलं आहे. एखाद्या ठिकाणी भाषण करायचं आणि त्याची चित्रफित करुन समाज माध्यमांवर टाकायचं. करोडो लोकांनी ही चित्रफित बघितली आहे ऐकली आहे त्यामुळे संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशा स्वरुपाची तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले.