संपदा सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ निमित्त सुवर्णमहोत्सवी ‘संपदा’ शुभारंभ सोहळा
पुणे : देशातील सहकारी संस्थांना एकत्रित जोडण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतेच डिजिटल पोर्टल तयार केले आहे. या डिजिटल पोर्टल मध्ये येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील सहकारी संस्थांचाही समावेश करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही सहकारी संस्थांची पंढरी आहे. देशातील एकूण सहकारी संस्थांपैकी ४१ टक्के सहकारी संस्था या महाराष्ट्रामध्ये आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
संपदा सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ निमित्त आयोजित टिळक स्मारक मंदिरात सुवर्णमहोत्सवी संपदा या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत संचालक नानाजी जाधव, अम्ब्रेला आॅर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर, बँकेचे अध्यक्ष अश्विनी कुमार उपाध्ये, उपाध्यक्ष महेश लेले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बँकेतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे आणि आर्थिक साक्षरता अभियान पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये या सहकारी संस्थांनी मोठा वाटा उभारला आहे. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकास तळागाळापर्यंत पोहोचविला पाहिजे. व्यवसायिक आणि आंतरराष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करताना सहकारी बँका टिकतील की नाही अशी भीती अनेकांना होती. परंतु संपदा सहकारी बँके सारख्या अनेक सहकारी बँका या केवळ टिकल्याच नाहीत तर त्यांनी प्रगतीही केली. सहकारी बँका या सर्वसामान्यांना आधार वाटतात आणि त्या आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या पाठीशी उभ्या राहतील असा विश्वास वाटतो
ते पुढे म्हणाले, संपदा सहकारी बँकेने सुरू केलेल्या महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता या अभियानांना अतिशय महत्त्व आहे. राष्ट्र निर्मितीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या बँकेचे केवळ खातेदारांच्या विकासामध्येच नव्हे तर समाजाच्या विकासामध्ये ही मोठे योगदान आहे. बँकेने क्लाऊड कम्प्युटिंग च्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा घोटाळा होण्याची शक्यता नसते, परंतु अशावेळी सायबर गुन्हेगारी ला सामोरे जावे लागते, त्यामुळे सर्वसामान्यांना ऑनलाइन बँकिंग साक्षर केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ शंकर अभ्यंकर म्हणाले, मानवी जीवनामध्ये पैशाला सर्वाधिक महत्त्व आहे. परंतु त्या पैशाला कायम धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे. तरच त्यातून योग्य मनुष्य निर्मिती आणि समृद्ध समाज तयार होऊ शकतो. सावकारांना पर्याय म्हणून बँकिंग व्यवस्था निर्माण झाली. ही बँकिंग व्यवस्था देशाचा आर्थिक कणा आहे. ही व्यवस्था मजबूत व्हायची असेल तर देशातील प्रत्येक माणूस हा केवळ साक्षरच नव्हे तर आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी संपदा सहकारी बँकेने सुरू केलेल्या आर्थिक साक्षरतेचे अभियान निश्चितच इतर बँकांनाही मार्गदर्शक ठरू शकेल.
सुरेश जाधव म्हणाले, बँक व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी आणि कर्जदार हे सक्षम असणे गरजेचे आहे. या चार घटकांमध्ये योग्य समन्वय असेल तरच कोणतीही बँक आणि सहकारी संस्था यशस्वीपणे वाटचाल करू शकते. संपदा सहकारी संस्थेने गेल्या पन्नास वर्षांमध्ये हे तत्व पाळल्यामुळेच बँकेची भरभराट झाली आहे.
अतुल खिरवाडकर म्हणाले, बँक चालवणे अतिशय अवघड आहे त्यातही बँक नफ्यामध्ये चालविणे तारेवरची कसरत आहे. यामध्ये संपदा सहकारी बँक यशस्वी झाली आहे. संपदा सहकारी बँक ही ध्येयाने प्रेरित झालेली बँक आहे या बँकेने केवळ सर्वसामान्यांनाच आर्थिक सबल केलेले नाही तर समाजाच्या विकासामध्ये ही मोठे योगदान दिले आहे.
डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स, सीए प्रकाश कुलकर्णी, जी डी आपटे अँड कंपनी, सीए विवेक मटकरी, जेजे आयटी संस्था आणि बँकेच्या निवृत्त कर्मचारी नंदिनी कुकडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अश्विनी कुमार उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश सरदेशपांडे यांनी आभार मानले.
फोटो ओळ – संपदा सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ निमित्त आयोजित टिळक स्मारक मंदिरात सुवर्णमहोत्सवी संपदा या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बँकेतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे आणि आर्थिक साक्षरता अभियान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.
महाराष्ट्र ही सहकारी संस्थांची पंढरी-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Date:

