महावितरण व ३२ महाविद्यालयांमध्ये सामंजस्य करार
पुणे, दि. ०४ ऑगस्ट २०२३: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाला व्यावहारिक ज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड देणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने महावितरण व अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात झालेल्या ‘नॉलेज शेअरींग’ सामंजस्य करारातून नवे जग घडविणारे अभियंते निर्माण होतील असा विश्वास महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी गुरुवारी (दि.३) व्यक्त केला.
वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी, ज्ञानाचे आदानप्रदान, वीजसुरक्षा व महावितरणच्या विविध डिजिटल ग्राहकसेवा आदींबाबत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून ‘नॉलेज शेअरींग’ करण्यात येणार आहे. त्यासाठी रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात महावितरण, पुणे परिमंडल व जिल्ह्यातील ३२ अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालये यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, प्राचार्य डॉ. जी. ए. हिंगे, प्राचार्य सौ. गीता जोशी, प्राचार्य अनिल कपिले, संचालक आर. जी. कडूसकर, संचालक वल्लभ शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, तंत्रज्ञानामुळे वेगाने बदलणाऱ्या वीजक्षेत्राची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच बदलते वीजक्षेत्र, महावितरणमधील आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल ग्राहकसेवा आदींचे व्यावहारिक ज्ञान मिळणे गरजेचे आहे. त्यातून हे विद्यार्थी नवनवे तंत्रज्ञान शोधू शकतील व त्याचा वीजक्षेत्राला पर्यायाने ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
या कार्यक्रमात ‘नॉलेज शेअरींग’च्या सामंजस्य करारावर महावितरणकडून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी तर ३२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे संबंधित प्राचार्य, प्राध्यापक, प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली. या उपक्रमाचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनी सादरीकरणाद्वारे ‘महावितरण- बदलते तंत्रज्ञान व डिजिटल ग्राहकसेवा’ याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी महाविद्यालयांच्या सर्व प्रतिनिधींनी ‘नॉलेज शेअरींग’बाबत मनोगत व्यक्त केले तसेच ‘एनर्जी क्लब’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन जाहीर केले. या सामंजस्य करारामुळे ३२ अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सुमारे ९ हजार ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. वीजक्षेत्रातील माहिती व तंत्रज्ञान प्रत्यक्षात जाणून घेता येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनी केले. कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त), ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर आदींची उपस्थिती होती.

