मुंबई- काही दिवसांपासून राज्यात अजित पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राज्यात यापुढे कोणताही नेतृत्व बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी आहे त्याच पदावर राहणार आहोत. त्यात कोणताही बदल होणार नाही, असे ते म्हणालेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.
2019 हे वर्ष एक वेगळ्या प्रकारचे ठरले. यात अनेकांनी विक्रम केलेत. आमचे पहिले हिरो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी सत्ता परिवर्तन घडवून आणले. ते आता मुख्यमंत्री म्हणून कारभार चालवत आहेत. त्यानंतर अजित पवार हे आमचे दुसरे हिरो आहेत. प्रथम ते माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांसोबत उपमुख्यमंत्री झाले. नंतर ते विरोधीपक्षनेते झाले. आता आमच्यासोबत पुन्हा उपमुख्यमंत्री झाले.
त्यांच्या खालोखाल माझा क्रमांक आहे. अगोदर मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विरोधी पक्षनेता झालो. आता पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. पण आता यात कोणताही बदल होणार नाही. आता आम्ही ज्या पदावर आहोत, त्याच पदावर राहणार आहोत. आम्ही आमच्या जबाबदारीवर समाधानी आहोत, असे फडणवीस म्हणाले.
अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे – फडणीस सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. यावर फडणवीस यांनी आतापर्यंत कोणतेही भाष्य केले नव्हते. पण गुरुवारी विधानसभेत बोलताना त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील नेतृत्वबदलाची चर्चा फेटाळली होती. ते म्हणाले होते की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. मी व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी नीट पार पाडू द्या. कार्यकर्त्यांनी स्वतःचे समाधान करण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असतील.
भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राज्यात येत्या काळात आणखी एक राजकीय अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

