मुंबई-
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत स्थित एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी सुसाइड करण्यापूर्वी काही व्हॉइस क्लीप रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली. या क्लीपमध्ये 4 उद्योगपतींची नावे असल्याचा दावा केला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.यासंबंधीच्या वृत्तानुसार, नितीन देसाई यांनी मंगळवारी रात्री दिल्लीहून मुंबईला आले. त्यानंतर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ते कर्जतच्या एनडी स्टुडिओत पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावले. तुला उद्या सकाळी मी व्हॉइस रेकॉर्डर देतो, असे ते त्यांना म्हणाले.
त्यांच्या सूचनेनुसार मॅनेजरने बुधवारी रेकॉर्डर घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी मेगाहॉलजवळ त्यांचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. त्यावेळी हा व्हॉइस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच पडला होता. पोलिसांनी तो जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या व्हॉइस नोट्समध्ये 4 व्यावसायिकांची नावे आहेत. त्यांनी आपल्याला कसे छळले, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, याचा उल्लेख आहे.त्यामुळे आता हे चारही व्यावसायिक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची भीती आहे. पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचीही माहिती आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नितीन देसाई यांनी दिल्लीहून परतल्यानंतर लगेचच आत्महत्या केल्यामुळे त्यांनी विमान प्रवासात आत्महत्या करण्याची मानसिक तयारी केली असावी, असा दावा केला जात आहे.दरम्यान, नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी न्यायवैद्यक पथकासह श्वान पथकालाही पाचारण्यात आले आहे.
नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी दापोली येथे झाला. कलादिग्दर्शन, दिग्दर्शन वअभिनय या तिन्ही माध्यमांत त्यांनी जोरदार काम केले. त्यांना त्यांच्या कामासाठी 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. परिंदा, डॉन, माचिस, वजूद, 1942 अ लव्ह स्टोरी, अकेले हम अकेले तुम, प्यार तो होना ही था, सलाम बॉम्बे, लगान, मिशन कश्मीर, हम दिल दे चुके सनम आदी अनेक गाजलेल्या सिनेमांशी त्यांचा संबंध होता. त्यांनी 2005 मध्ये एन.डी. स्टुडिओची स्थापना केली होती. स्टुडिओ आगीत भस्मसात झाल्यानंतरही नितन यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी पुन्हा मोठ्या कष्टाने हा स्टुडिओ उभा केला.

