मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा- प्रधानमंत्री

Date:

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. १: शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादृष्टीने पुणे शहरात मेट्रो सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २ च्या पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण, पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

पुणे शहर हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर
पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, या पाच वर्षात पुण्यात सुमारे २४ कि.मी. मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले आहे. पुण्यासारख्या शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे आवश्यक असून हे जाळे वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २०१४ पर्यंत देशात २५० कि.मी. पेक्षा कमी मेट्रो नेटवर्क होते. आता देशात ८०० कि.मी. पेक्षा अधिक मेट्रोचे जाळे तयार झाले असून आणखी 1 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरात असलेली मेट्रो आज देशातील २० शहरात संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो कार्यरत आहेत. मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची नवी ‘जीवनरेषा’ बनत आहे, असेही श्री. मोदी म्हणाले.

‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर
श्री. मोदी पुढे म्हणाले, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयांच्या निर्मतीपूरते मर्यादित ठेवले नाही तर कचरा व्यवस्थापनावर भर देत आहोत. कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेवर भर देत आहोत. पिंपरी चिंचवडचा ‘वेस्ट टू एनर्जी’ खूप उत्कृष्ट प्रकल्प असून यातून कचऱ्यापासून वीज बनणार आहे. यामुळे प्रदुषणाची समस्या नष्ट होण्यासह महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे.

महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे. म्हणून येथे औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे. रेल्वेच्या विकासात २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना आसपासच्या इकॉनॉमिक हबशी जोडले जात आहे. मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे औद्योगिक विकास होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुळे महाराष्ट्राची उत्तर भारतासोबत रेल्वे जोडणी वाढणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान बनविण्यात आलेल्या पारेषण वाहिनी जाळ्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना नवी गती मिळणार आहे. त्याचबरोबर ऑईल गॅस लाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ, सेंद्रा बिडकीन औद्योगिक पार्क यांच्यात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याची क्षमता आहे.

डिजीटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा
महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा विकास होईल आणि भारताचा विकास होईल त्याचा तेवढाचा लाभ महाराष्ट्राला होईल. गेल्या ९ वर्षात इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या बाबतीत भारताने जगात नवी ओळख मिळवली आहे. आज स्टार्टअपची संख्या १ लाखाच्या वर झाली आहे. ही इकोसिस्टीम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे तयार झाली आहे. भारतात डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया घालण्यात पुण्याचा मोठा वाटा आहे. स्वस्त स्मार्टफोन, गावोगावी पोहोचलेल्या इंटरनेट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. जगभरात सर्वाधिक वेगाने ५ जी इंटरनेट सुविधा पोहोचवणारा आपला देश बनला आहे. फिनटेक, बायोटेक, ॲग्रीटेक आदी सर्वच क्षेत्रात आपले युवा उत्कृष्ट काम करत आहेत.

गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक घरांची निर्मिती
गेल्या ९ वर्षात गाव आणि शहरात गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. त्यातही शहरी गरिबांसाठी ७५ लाखापेक्षा अधिक घरे बनविली आहेत. नवीन घरांच्या निर्मितीमध्ये पारदर्शकता आणली असून गुणवत्ताही सुधारली आहे. त्यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्या नावावर करण्याचे काम आम्ही केले आहे. पहिल्यांदाच महिलांच्या नावावर काही संपत्ती नोंदणीकृत झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

देशाची ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे शहर, जिल्हा ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथे मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. पुणे मेट्रोमुळे मुंबई शहरासारखाच लाखो पुणेकरांनाही लाभ मिळणार आहे. रिंग रोडसह पुणे शहरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत त्याला चालना देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, विद्यार्थी तरुण या सर्वांसह सर्वसमावेशक विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत. सर्वसामान्याचे, गोरगरीबाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत.

प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. देशाचे ५ ट्रिलियन डॉलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची आपली जबाबदारी असून त्यात महाराष्ट्र योगदान देईल. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

पुणे मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल-देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मेट्रोच्या दोन मार्गिका जोडल्या जात असल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरिता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. यात तयार झालेले एक एक स्थानक स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. मेट्रोचा वाढीव टप्पा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने पुणे व पिंपरी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक बसेसचा ताफा पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पीएमपीएमएलकडे आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांची संकल्पना असलेली कुठलेही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये होत आहे.

चक्रीय अर्थव्यवस्था असली पाहिजे या प्रधानमंत्री मोदींच्या भूमिकेनुसार पिंपरी चिंचवड मनपाकडून उभारण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्प’ हे उदाहरण आहे. त्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा अपारंपरिक असणार आहे. तसेच त्यासाठीचे पाणी देखील एसटीपी मधून पुर्नप्रक्रिया केलेले असेल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या घरांमुळे येत्या काळात एकही कुटुंब बेघर राहणार नाही. पुणे ही औद्योगिक नगरी, माहिती तंत्रज्ञान नगरी आहे, स्टार्टअपची राजधानी आहे. येत्या काळात पुण्याला नवीन रिंगरोड आणि नवीन विमानतळ देणार आहोत. खऱ्या अर्थाने पुणे ही जशी विद्येची, उद्योगाची नगरी आहे तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल हा विश्वास आहे.

शहराच्या विकासात पुणेकरांची साथ-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहराच्या विकासाबरोबरच महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. मेट्रोच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुणेकरांनी एकजुटीने काम केले.

ते पुढे म्हणाले, ३५० वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याचा विकास करण्याचे काम केले. या भूमीत अनेक कला, क्रीडा तसेच गुणवंत, बुद्धीवंतांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिले. शेतकरी, कष्टकऱ्यांनी पुण्याच्या वैभवात भर घातली. उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. देशातील प्रत्येक गोरगरीब, कष्टकऱ्याला स्वस्तात घर देण्याचे प्रधानमंत्री यांचे स्वप्न आहे. आज पंतप्रधान यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड येथील घरांचे लोकार्पण होत आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या घरात सुखाचा,आनंदाचा संसार करा आणि मुलांना जबाबदार नागरिक बनवा, असाही संदेश त्यांनी लाभार्थ्यांना दिला.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मेट्रोच्या दोन्ही मार्गाना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले आणि प्रातिनिधिक स्वरुपात 3 महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या चाव्या वितरीत केल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

विकासकामांमुळे शहर विकासाला गती
पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. या मार्गिकांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे आणि पुणे शहरातील महत्वाची ठिकाणे जोडली गेली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १ हजार २८८ घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेल्या २ हजार ६५८ घरे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे १ हजार १९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प क्षमता ७०० टन प्रति दिवस असून वीज निर्मिती क्षमता १४ मेगावॅट प्रति तास आहे.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...