पुणे–
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांचे उद्घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या दौऱ्याच्या आधीच पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दौऱ्याच्या आधल्या दिवशीच पुणे शहरात पंतप्रधानांविरोधातील बॅनर झळकले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पुणे युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करणारे बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून ‘मन की बात बंद करो मणिपूर की बात करो’ तसेच ‘गो बँक क्राईम मिनिस्टर’, ‘देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या बरोबरच विरोधकांच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पुरस्कार प्रदान सोहळ्यच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामुळे देखील या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोघे या आधी देखील एकाच मंचावर दिसून आले होते. मात्र, आता पंतप्रधानांनी केलेला भ्रष्ट्राचाराचा आरोप आणि अजित पवार यांनी दिलेली भाजपची साथ याची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरणार आहे.

