नांदेड-“सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे,” असं खळबळजनक विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचं खोटं लेटरपॅड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यांच्या अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्यावर अज्ञात व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
बोगस लेटरपॅडच्या अधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. संबंधित आरोप करताना अशोक चव्हाणांनी कोणचंही नाव घेतलं नाही. पण संबंधित बोगस पत्र तयार करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामागचा मूख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढलं पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. ते नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
“पण जे कोणी हे सगळं करत आहे, त्यांना एवढंच सांगायचं आहे की, अशोक चव्हाणाचा जीव गेला तरी हरकत नाही, पण अशोक चव्हाण तुमच्या सारखा डुप्लीकेट आणि खोटं बोलून नेतृत्व करणारा नेता नाही. तुमच्यात नेतृत्व करण्याची जी चढाओढ चालली आहे, त्याबाबत आमची काहीही तक्रार नाही. आम्ही तुमचं नाव एकदाही घेत नाही. दुर्दैवाने माझ्यावर हा प्रसंग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मी या घटनेचा उल्लेख करत आहे. पण हा प्रयत्न अतिशय केवीलवाणा आहे. लोकांची मनं जिंकता येत नाहीत. म्हणून हा कार्यक्रम सध्या सुरू झाला आहे, हे दुर्दैव आहे,” असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.