पुणे : देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या ३६५ जागांवर विजय मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.२९) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार संजय काकडे, अमर साबळे, प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, संदीप खर्डेकर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, धीरज घाटे, रवी अनासपुरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाले, ‘‘दर तीन वर्षांनी पक्षात बूथ प्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंतच्या सर्व पदाधिकारी निवडीची प्रक्रिया ही केवळ भाजपमध्येच केली जात आहे. अन्य कोणत्याही पक्षात भाजपसारखी पदाधिकारी निवडीची पद्धत रूढ नाही.यानुसार भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात राज्यात भाजपचे सरकार सत्तेत नव्हेत. तरीसुद्धा अशा काळात पक्षाचे कार्यकर्ते टिकवून ठेवण्याचे काम जगदीश मुळीक यांनी केले. शिवाय घाटे हे सामान्य घरातून आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना संघर्ष नवा नाही.’’पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वासाने मोठी जबाबदारी टाकली आहे. मुळात मी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून राजकारणास सुरवात केलेली आहे. त्यामुळे सातत्याने आक्रमक विचाराने विविध आंदोलने केल्याचे घाटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी संजय काकडे, मुरलीधर मोहोळ यांचीही भाषणे झाली. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले.

