रायगड–
जोरदार पावसामुळे रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत 5 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 60 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी गावात 50 ते 60 घरे असून गावात जवळपास 200 ते 300 मतदार म्हणजेच 18 वयापुढील नागरिक आहेत. जवळपास 30 ते 40 घरातील लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. यातील जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक व एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्याला सुरूवात केली आहे. काही जणांना वाचवण्यात यश आले आहे.
25 जणांना वाचवण्यात यश
कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे घटनास्थळी पोहोचले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत. आतापर्यंत सुमारे 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळच हे गाव असून धरण परिसरातील घरांवरच दरड कोसळल्याची माहिती आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, इर्शाळवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. पावसामुळे जी पायवाट आहे, ती पूर्ण चिखलात गेली आहे. बचावपथकांनाही पायीच तेथे जावे लागत आहे. जेसीबी, पोकलेनही घटनास्थळी नेणे शक्य होत नाहीये. त्यामुळे बचाव पथकाचे सदस्य अक्षरश: हातानेच ढिगारे उपसत आहेत. गावापर्यंत मदतीचे साहित्य कसे न्यावे, हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांचे गावातच शवविच्छेदन करण्याचा विचारही आम्ही करत आहोत.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांना भेटून त्याना धीर दिला. त्याना लागेल ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे सांगून त्याना आशवस्त केले. तसेच घटनास्थळी मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळी उपस्थित आहेत. दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
- दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना आदिती तटकरे यांना दिल्या आहेत.
- मदतीसाठी इर्शाळवाडी गावातच पोलिस कंट्रोल रुम बनवण्यात आले आहे. मदतीसाठी 8108195554 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत.
- उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले आहेत. गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याबाबत ते माहिती घेत असून अधिकाऱ्यांना सूचनाही देत आहेत.

