पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सब-ज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत पालघरच्या देव रुपारेलिया आणि पुण्याच्या यश्वी पटेल यांनी अनुक्रमे १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत पालघरच्या देव रुपारेलियाने पुण्याच्या साचेत त्रिपाठीला २१-८, २१-१३ असे सहज पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले.
पहिली गेम अगदीच एकतर्फी झाली. देवच्या आक्रमक खेळासमोर साचेत निष्प्रभ ठरला. देवच्या बॉडी स्मॅशेसने साचेतला निरुत्तर केले. देवचे क्रॉस कोर्टचे फटकेही सुरेख होते. नेटजवळ खेळताना त्याने चपळाई दाखवली. दुसऱ्या गेममध्ये साचेतने थोडा फार प्रतिकार केला. मात्र, तो पुरेसा ठरला नाही. देवने त्याला पुनरागमनाची संधी दिली नाही. देवने साचेतवर अवघ्या २५ मिनिटांत मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत देवने नागपूरच्या ऋत्वा साजवानला २१-१९, २१-१४ असा ४३ मिनिटांत पराभूत केले, तर साचेतने ठाण्याच्या यश सिन्हाचे आव्हान १८-२१, २१-८, २१-१५ असे परतवून लावले. ही लढत ४५ मिनिटे रंगली.
या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या शौर्या माधवीवर २१-११, २१-१५ अशी मात करून जेतेपद निश्चित केले. ही लढत ३० मिनिटे चालली. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला थोडी चुरस बघायला मिळाली. मात्र, नंतर यश्वीने शौर्यावर वर्चस्व राखले. तिने बेसलाइनवरून अप्रतिम खेळ केला. तिच्या रिटर्नच्या फटक्यांचे प्रत्युत्तर शौर्याकडे नव्हते. दुसऱ्या गेममध्ये शौर्याने आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला यश आले नाही. विश्रांतीनंतर यश्वीने आक्रमक खेळ केला आणि शौर्याला पुनरागमनाची संधीच दिली नाही. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत शौर्याने कोल्हापूरच्या दक्षायणी पाटीलला २३-२१, २१-१६ असे ३७ मिनिटांत पराभूत केले, तर यश्वी पटेलने गाथा सूर्यवंशीचे आव्हान २१-१७, २१-१५ असे ३८ मिनिटांत परतवून लावले.
हर्षित माहीमकर-केतकी थिटेला जेतेपद
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीत हर्षित माहीमकर आणि केतकी थिटे जोडीने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत या जोडीने अंतिम फेरीत सार्थक नलावडे आणि ऋतिका कांबळे जोडीला २१-१३, २१-१८ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत हर्षित-केतकी जोडीने ओम निऱ्हाळे-अनन्या शिंदे जोडीला २१-१०, २१-१४ असे, तर सार्थ-ऋतिका जोडीने ईशान वानखेडे-तन्वी घारपुरे जोडीला २५-२३, २१-१८ असे नमविले. १५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत अवधूत कदम (पुणे) आणि ऋत्वा साजवान (नागपूर) जोडीने विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत अवधूत – ऋत्वा जोडीने अर्जुन खांडेकर-अर्णव पळशीकर जोडीला २१-१४, २१-१६ असे नमविले. १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत नागपूरच्या रिधीमा सरपटे-शौर्या माधवी जोडीने बाजी मारली. या जोडीने अंतिम फेरीत गाथा सूर्यवंशी-प्रांजल शिंदे जोडीवर ११-२१, २१-१८, २१-१५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून जेतेपद पटकावले.

