पुणे- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आज दीपक मानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून , श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजाची आरती करून कामाला प्रारंभ केला . आज यावेळी मानकर यांना शुभेछ्या देण्यासाठी नारायण पेठेत देखील प्रचंड गर्दी झाली होती .

मानकर यांच्या परिवाराने त्यांचे अभिनंदन करून पुढील जनहिताच्या कार्यात त्यांच्या समवेत राहण्याचा विश्वास दिला .मानकर यांनी यावेळी विविध माध्यमांशी मिळेल तसा संवाद देखील साधला . यावेळी दीपक मानकर म्हणाले ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वी रित्या पार पडण्यासाठी प्रयत्न तर करेल पण या संधीचे सोने करण्याचा खास प्रयत्न असेल. सामान्य आणि मध्यमवर्गीयांना सत्तेचा फायदा कसा होईल याकडे विशेषतः लक्ष घालेल , मुंबईच्या धर्तीवर पुण्यात देखील ५०० चौरस फुटाच्या घरांना मिळकत कर माफी मिळावी आणि पुण्यात महापालिकेची शिवसृष्टी व्हावी या दोन गोष्टींना आपल्या कामकाजात सर्वाधिक प्राधान्य असेल असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा प्रश्न उपस्थित करताच ते म्हणाले, प्रशांत जगताप यांनी स्वतःच्या नावावर पक्षाच्या कार्यालयाचे करारपत्र करवून घेणे चुकीचे होते , त्यांनी स्वतः ते कार्यालय पक्षाला देणे अपेक्षित आहे . अन्यथा आम्ही याच परिसरात जवळपास दुसरीकडे कार्यालयासाठी जागा पाहू आणि कार्यालय उभारू , किंवा प्रशांत जगताप देखील अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत येऊन जनहिताच्या प्रश्नांची सोडवणूक करतील .


