पुणे-राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील कोंढवा परिसरातून २ दिवसांपूर्वी जुबेर नूर मोहंमद शेख (३६) या तरुणाला ताब्यात घेतले आहे. बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांचे मन:परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. विविध राज्यांतील २० जण त्याच्या संपर्कात असल्याचे तपास यंत्रणेच्या चाैकशीत समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.४ ते ५ वर्षांपासून तो सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांशी संपर्क साधल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच प्रक्षोभक साहित्ची निर्मिती केल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएने त्याच्या घरी टाकलेल्या छाप्यात इसिस संघटनेशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे, साहित्य, लॅपटॉप, मेमरी कार्ड, मोबाइल असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
जुबेर हा कराडचा रहिवासी असून तो संगणक अभियंता आहे. सुरुवातीला पुण्यातील खडकी परिसरात तो कुटुंबासोबत राहत होता. सन २०१३ पासून तो कोंढवा भागात राहण्यास गेला. तीन भाऊ, दोन बहिणी, आई-वडील, पत्नी, दोन मुले असा त्याचा मोठा परिवार आहे. हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत तो नोकरीला असून त्याला वार्षिक १५ लाखांचे पॅकेज आहे. त्यानंतरही तो इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडिया ग्रुपवर ‘अबू नुसैबा’ या नावाने वावरत होता. त्याद्वारे आपला धर्म कशा प्रकारे श्रेष्ठ आहे आणि इतर धर्म कशा पद्धतीने कमी महत्त्वाचे आहेत, याबाबतची माहिती तो आपल्या समाजातील तरुणांना देऊन त्यांचे कट्टरतेकडे मन:परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील होता. बॉम्ब, शस्त्रनिर्मितीच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्नशील
इसिस संघटनेच्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी जुबेर हा प्रयत्नशील असल्याने तपास यंत्रणांच्या रडारवर तो आला होता. त्याच्यासोबत इतर शहरांतील काही जण असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यामुळे एकाच वेळी त्यांनी मुंबई, ठाणे व पुणे येथे छापा टाकून जुबेर शेख याच्यासोबत ठाण्यातून शरजील शेख व झुल्फिकार अली बडोदावाला व मुंबईतील नागपाडा येथून ताबीश नासेर सिद्दिकी यांना अटक केली आहे. इसिसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट आरोपींनी रचल्याची माहिती यंत्रणेने दिली. महाराष्ट्रात स्लीपर सेलचे जाळे विणण्याचे काम आरोपी करत होते. तसेच तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करून त्यांना बॉम्ब (आयईडी) बनवण्याचे व छोटे शस्त्र, पिस्तूल निर्मितीसाठी ते प्रयत्नशील असल्याचेही समोर आले.

