मुंबई-महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्यामुळेच त्यांनी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी फोडली उद्या हे महाराष्ट्र फोडतील तेव्हा त्यांना विरोध करणारं कुणी नको आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार सुरु आहेत. ही लढाई अत्यंत घाणेरडी आणि विकृत आहे. शिवसेना नको म्हणून शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.
अजित पवार यांनी 2 जुलै 2023 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत या पक्षात आता शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. कारण अजित पवार यांनी चिन्हावर आणि पक्षावरही दावा सांगितला आहे. या सगळ्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली मत मांडत भाजपवर शरसंधान साधले.
राष्ट्रवादीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट
रविवारी जेव्हा राज्यात राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका पार पडल्या. यापैकी एक शरद पवार गटाची होती तर दुसरी अजित पवार गटाची. अजित पवारांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचाच मुद्दा उपस्थित केला. तर शरद पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर यथेच्छ टीका केली. यापुढच्या दिवसांमध्येही हे चित्र बघायला मिळणार आहे. अशात आता उद्धव ठाकरे यांनी हे सगळं घाणेरडं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजपाला महाराष्ट्र फोडायचा आहे असाही आरोप केला आहे.

