राजीव गांधी स्मारक समिती कडुन नव्या कुलगुरूंचे अभिनंदन..!
पुणे, दि. 6 जुलै 2023 -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील “प्रथम वर्ष प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया” सध्या सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे, अभ्यासक्रमाबाबत माहिती देणे, प्रवेशा बाबतच्या अडचणी सोडवणे यासाठी एक ‘मदत व मार्गदर्शन केंद्र’ विद्यापीठाने सुरू करावे अशी मागणी राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे बुधवारी करण्यात आली. राजीव गांधी स्मारक समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. गोसावी यांची कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांचे पुढील कारकिर्दीस शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या..!! यावेळी काँग्रेस नेते व स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, ॲड फैय्याज शेख, ॲड श्रीकांत पाटील, ॲड बाळासाहेब बावणे, भोला वांजळे, दीपक जाधव (पत्रकार), धनंजय भिलारे, ॲड स्वप्निल जगताप, ॲड रेशमा शिकलगार, ॲड अश्विनी गवारे, ॲड संतोष जाधव, दिपक जाधव, आबा जगताप, संजय अभंग, विकास दवे इ. धैर्यशील हांडे, नरेश आवटे आदी उपस्थित होते. कुलगुरूंसोबत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहाची क्षमता खूप अपुरी पडते आहे, ती वाढविण्यात यावी. कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांचे मानधन वाढविण्यात यावे. बंद ठेवण्यात आलेले अनिकेत कॅन्टीन तातडीने सुरू करण्यात यावे. पदवीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तातडीने लावून नवे शैक्षिणक वर्ष लवकर सुरू करावे. विद्यापीठातील सर्व निविदा प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणून त्यामध्ये गैरव्यवहार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे करण्यात आल्या. कुलगुरूंनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या काळात याबाबत योग्य ते निर्णय घेतले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

