अजित पवारांसह 11 जणांची हकालपट्टी
राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नाही
कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही
वेळ आल्यावर बहुमताचे पाहू..निवडणूक आयोगावर आमचा विश्वास
२०२४ ला कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचीच सत्ता येईल
नवी दिल्ली: पक्ष फोडणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी दिला आहे. आम्ही जनतेमध्ये जाणार असून जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आलं असून तशी घोषणा दिल्लीतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर करण्यात आली. तसेच ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय बैठकीत आज आठ प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत. जर राष्ट्रवादीच्या विचारधारेच्या विरोधात कुणी जात असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकाररिणीचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू असं शरद पवारांनी माध्यमांना सांगितलंअजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, कुणाला काय व्हायचंय याच्याशी मला काही घेणं-देणं नाही.
पक्षावर कोणीही दावा करू द्या, कोणीही काहीही बोलत असेल त्याला काही तथ्य नाही, आज दिल्लीत झालेल्या बैठकीत 11 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळेल. राष्ट्रवादीचा मी एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आयोग आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगाव्यतिरिक्त अन्य संस्थांकडून जाऊ, असे बोलत पवारांनी आपल न्यायालयातही जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.
अजित पवारांसह 11 जणांची हकालपट्टी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण ८ ठराव मंजूर केले आहेत.

