मुंबई–
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरी आता टोकाला पोहोचली आहे. अजित पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झालेत. त्यानंतर आता शरद पवारांच्या नेतृत्वात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. शरद पवार तिथे पोहोचण्यापूर्वीच अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांचे फोटो असणारे बॅनर्स काढून टाकण्यात आले आहेत.
आता नवे पोस्टर छापण्यात आलेत. त्यात अजित पवार व प्रफुल्ल पटेलांचे फोटो नाहीत. यापैकी एका पोस्टरवर बाहुबली चित्रपटातील कट्टपाने बाहुबलीवर पाठीमागून वार केल्याचा फोटो आहे. त्यावर गद्दारांना जनता माफ करणार नाही, असा संदेश लिहिण्यात आला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी व कार्यकारी समितीतून अजित पवारांसोबत गेलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव आधीच वगळण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा म्हणून नोंद असल्याची माहिती मिळत आहे.
- शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, खासदार, श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार मोहम्मद फैजल, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीला हजर आहेत. देशातल्या विविध राज्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात दिल्लीत सुरू असणारी बैठक अवैध असल्याचा आरोप केला आहे.
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक सुरू. पक्षाचे अनेक जुने जाणते नेते उपस्थित
- अजित पवार यांच्याशी युती झाल्यानंतर आमदारांमधील मतभेदाच्या वृत्तावर एकनाथ शिंदे म्हणाले – पक्षात सर्व काही ठीक आहे. मी राजीनामा देत नाहीये. काही दिवसांतच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला जाईल, असे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. भाजपनेही प्रत्युत्तर देत म्हटले की, फक्त शिंदेच मुख्यमंत्री राहतील.
- राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या 32 समर्थक आमदारांना ताज हॉटेलमध्ये पाठवले आहे. ते पुन्हा माघारी जाण्याच्या भीतीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

