मुंबई-आज मुंबईत सभेला संबोधित करताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीकास्र सोडले. ठाण्यातील तो पठ्ठा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे असे पक्ष सोडून गेले, असा आरोप अजित पवारांनी केला. दुसरीकडे अजित पवारांच्या आरोपाला जितेंद्र आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. मला जे बोलायचे ते बोला, पण साहेबांवर जे काही बोलला आहात, त्यांच्याविरोधात मी उभा आहे.शरद पवार तुम्हाला का लुळे-लंगडे, एका ठिकाणी बसलेला माणूस हवा होता का, त्यांच्याविषयी असलेली आस्था तुम्हाला संपवायची आहे. त्यासाठी तुम्ही लोकांनी रचलेले षडयंत्र आहे. एवढाच त्यांच्याविषयी राग असेल तर त्यांचे कशाला फोटो वापरता.?ज्यांच्याकडे वय नाही त्यांना हाकलण्यासाठी इतका आटापीटा का सुरू झाला?ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्याला या घरट्यातूनच बाहेर काढायचे? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना केले आहे.
अजित पवारांच्या टीकेबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्यामुळे पक्षाचे नेते पक्ष सोडून गेले, असं त्यांना तसं वाटत असेल. तर ठीक आहे. अजित पवारांबद्दल माझी काहीही तक्रार नाही. माझी तक्रार फक्त एकच आहे. शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी आणि घरी बसावं, ही जी भावना तुम्ही व्यक्त करताय, त्याविरोधात मी तुमच्याविरोधात उभा राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून आज मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. अजित पवार गटाकडून मुंबईतील एमईटी येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर शरद पवार गटाकडून वाय बी चव्हाण सेंटर सभागृहात मेळाव्याचं आयोजन केलं होते. या मेळाव्यातून दोन्ही गटातील नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन घरी बसावं आणि आशीर्वाद द्यावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचे आहे, ते तुम्ही बोला. लोकशाहीमध्ये तुम्हाला तो अधिकार आहे. पण जो कर्तृत्ववान मुलगा असतो, तो आपल्या म्हाताऱ्या बापाला नेहमी सांगतो, तुम्ही काम करत राहा. पण तुम्ही (अजित पवार) तर सगळे मिळून त्यांना निरोपच देत आहात. घरी बसायला सांगत आहात. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की, ते अजिबात घरात बसणार नाही.
आव्हाड म्हणाले की, कायद्याच्या बाजू गुंडाळून या देशाला कोणत्या दिशाकडे घेऊन जात आहात. ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्याला या घरट्यातूनच बाहेर काढायचे. त्यांचे ते छोटेसे घरटे होते. त्यातून बाहेर काढायचं. साहेबांनी तुमची कुठलीच महत्त्वकांक्षा रोखली नाही. त्याच व्यक्तीला तुम्ही लोक घरी जा, बाय बाय करू लागला आहात. यात काही माणुसकी असते का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
स्वतःचे मन असते. आपल्यासाठी कोणी कोणी कधी काय काय केले आहे. शरद पवारांनी त्यांच्यासाठी काय काय केले आहे. त्यांना माहित नाही का, त्यांनी अजिबात सत्ता भोगली नाही. तुम्हा सर्वांना सत्ता दिली. ज्या आईने खायला वाढले, त्या आईच्या हातातून भांडे ओढून घेण्यासाठी तयार झालात, असे सांगत आव्हाडांनी अजित गटावर निशाणा साधला.
शेवटी नारळ कोणावर फोडावे लागते. माझ्या मागे बाप-आई नाही. माझी कंपनी नाही, कारखाना नाही. कोणाचीही साथ नाही. माझ्यामागे फक्त शरद पवार ही एकमेव ताकद आहे. तरी देखील हा बोलतो. म्हणून काही लोकांचे दुखणं असू शकते. माझ्याविरूद्ध बोलणे सोपे आहे. पण मी कायम साहेबांसोबत राहील. शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार आहे.
आज मुंबईतील आमदार निवासातून एक आमदार घेऊन गेले. जे फेसबुक पेजवर पवारसाहेबांच्या समर्थनार्थ लिहतात. त्यांना धमक्या येत आहेत. परंतू अशा लोकांची घुसमट केली जात आहे. पण ते अजिबात घाबरणार नाहीत. आम्ही लढत राहणार आहोत.
पवार साहेबांवर कशा पद्धतीने जबरदस्ती केली जात होती. पण शरद पवार त्यांना नकोसे झाले होते. काही लोक म्हणतात माझ्याकडे वय आहे. ज्यांच्याकडे वय नाही त्यांना हाकलण्यासाठी इतका आटापीटा का सुरू झाला. त्यामुळे अशा पद्धतीने बोलून तुम्ही आम्हाला हरवू शकत नाही. असा घणाघात आव्हाडांनी केला.

