सीसीटीव्हीमुळे मित्राचा सहवास उघड आणि संशय बळावला
पुणे-एमपीएससी परीक्षेत राज्यात चमकलेली दर्शना दत्ता पवार (वय २६, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) या तरुणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या परिसरा कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. तपासादरम्यान दर्शना पवारचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता. अखेर या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी राहुल हंडोरे यास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना सापळा रचून अटक केली आहे. त्यामुळे दर्शना पवार खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दर्शना पवार एमपीएससी परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झालेली होती. 12 जूनरोजी ती मित्र राहुल हंडोरेसोबत (रा. नाशिक) राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेली होती. विशेष म्हणजे या दिवसापासून राहुल हंडोरे फरार होता. त्यामुळे खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिस पथके संशयित राहुल हंडोरेच्या मागावर होती. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सुरुवातीला दर्शना हिचा खून झाला आहे की नाही याबाबत पोलिसांना संशय होता. मात्र, शवविच्छेदन अहवालामध्ये दर्शनाच्या डोक्यावर तसेच शरीरावर जखमांच्या खुना आढळल्या आहेत. या जखमा या किल्ल्यावरून पडून झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले होते. तिला कोणत्यातरी वस्तूने मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे 12 जून रोजी घटनेच्या दिवशी नेमके काय झाले? याबाबतचा तपास पोलिस पथके करत आहेत.
पोलिसांच्या तपासात राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर्शना आणि राहुल हे दोघे किल्ल्याच्या दिशेने जाताना पाहावयास मिळाले. मात्र, ते परतत असताना केवळ राहुल हा दुचाकीवर आल्याचे दिसून आले. त्यानंतर राहुलने बंगळुरू येथे जाऊन एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, बंगळुरू या ठिकाणी न थांबता, राहूल लगेच चंदिगड याठिकाणी गेला. त्याठिकाणी काही काळ घालवल्यानंतर हावडा एक्सप्रेस रेल्वेने कलकत्त्याच्या दिशेने तो गेल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालेले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस पथके आरोपीच्या मार्गावर होती.
एमपीएससी परीक्षेत मिळालेल्या पुण्यातील एका संस्थेकडून दर्शना हिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. 9 जून रोजी ती पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हांडोरे होता. 12 जूननंतर तिचा मोबाइल क्रमांक बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, दर्शनाबरोबर असलेला मित्र राहुल हांडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दिली होती. रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ परिसरात दर्शनाचा मृतदेह सापडला.

