पुणे-जीवनाला कंटाळून डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांचा खून करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड येथे मंगळवारी घडली. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (४२) आणि पत्नी पल्लवी दिवेकर (३५) यांचे मृतदेह घरात छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. मुलगा अद्वित अतुल दिवेकर (११) आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (७) यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत.
डॉ. दिवेकर हे गुरांचे डॉक्टर,तर त्यांची पत्नी एका शाळेत शिक्षिका होती, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट मिळाली असून त्यात “जीवनाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे.मुलांना जगताप मळ्यातील विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली आहे. आमच्यानंतर मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना मारले आहे. या गोष्टीस सर्वस्वी मी जबाबदार आहे,’ असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.
–डॉ. दिवेकर यांच्या घराजवळ विहीर असून ती जवळपास १० परस इतकी खोल आहे. तीत ४५ फूट एवढे पाणी होते. त्यामुळे बुडालेली मुले वर काढण्यात मोठी अडचण आल्याचे सांगण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दौंड पोलिस याबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.

