पुणे – येथील मुळा नदीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका बोपखेल ते खडकी असा पूल बांधत आहे. पुलाच्या बांधकामाची पाहणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) केली आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पूलाची लांबी १ हजार ८६६ मीटर आहे. पुलाचे जवळपास ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झालेले असून पूल सुरु होण्यासाठी जवळपास ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.
हा पूल सुरु झाल्यानंतर खडकी व बोपखेल भागातील नागरिकांची सोय होईल. काम लवकरात लवकर होण्यासाठी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करेन, असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले.
या पाहणीच्या वेळी रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, धर्मेश शहा, तसेच पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

