मुंबई–
येऊ घातलेला वर्धापन दिन, ५ मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा अन् युतीमधील धुसफूस या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१२ जून) रात्री वरळी येथील एनएससीआय येथे शिंदे गटाची बैठक पार पडली. बैठकीला सेनेचे आमदार, खासदार, मंत्री अन् जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. आपल्या कोणाही मंत्र्यांचा राजीनामा होणार नाही, निश्चिंत राहा, अशी ग्वाही या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिली.शिंदे म्हणाले, पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. पक्षामध्ये विविध जिल्ह्यांतून राज्यातून नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत दाखल हाेत आहेत. सरकारबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
शिंदे सेनेच्या ५ मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार, अशा बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत. या बातम्या सरकारमधील जबाबदार मंडळींनी पेरल्या आहेत. याचा जाब विचारला पाहिजे, अशा तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. मला सगळे माहिती आहे, कोण कुठे काय करते ते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एकाही मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही, अशी ग्वाही दिली.