पुणे-आमदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा मी निषेध व्यक्त करताे. पवार आमचे विराेधी नेते असले तरी महाराष्ट्राची संस्कृती याप्रकारची नाही. आमदार राणे, खासदार संजय राऊत सारख्या वाचाळवीरांवर पक्षाने प्रसारमाध्यमाशी बाेलण्यास बंदी घातली पाहिजे असे वक्तव्य माजी खासदार संजय काकडे यांनी केले आहे.
माजी खासदार संजय काकडे पुढे बोलताना म्हणाले की, नीतेश राणे, नीलेश राणे यांच्याबाबत पक्षातील वरिष्ठांकडे मी तक्रार करणार आहे की, अशाप्रकारचे त्यांच्या वक्तव्यामुळे काही लाेक पक्षापासून दुरावले जातात.याची काळजी घेतली पाहिजे. विराेधकांनी आम्ही सत्ता चालवताना काही चुकत असेल तर टिका टिप्पणी करावी. परंतु काेणत्याही नेत्याबाबत कुत्र्यापासून माकडापर्यंत, डुक्करापर्यंत खालच्या पातळीची टिका करणे याेग्य नाही. काेणत्याही प्राण्याची नेत्यांना उपमा देण्याचे राहिलेले नाही इतका टीकेचा दर्जा घसरलेला आहे, असे मत माजी खासदार संजय काकडे यांनी येथे व्यक्त केले.
संजय काकडे म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी लाेकांना काय दाखवायचे ठरवावे त्यानुसार त्यांनी राेज सकाळी संजय राऊत, नीलेश राणे यांच्याकडे जाणे बंद करावे. आमच्या पक्षातील देखील वाचाळवीरांना प्रसारमाध्यमांशी बाेलण्यास बंदी घालावी. त्यामुळे पक्षाला धाेका निर्माण हाेऊ शकताे असे लेखी पत्र केंद्र व राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना देणार आहे.
संजय काकडे म्हणाले की, काेल्हापूर दंगल सक्षमपणे सांभाळण्यास पाेलीस दल सज्ज आहे, माध्यमांनी थाेडा संयम बाळगावा. औरंगजेबच्या उपमा काेणत्याही पक्षाने काेणाला देऊन काही उपयाेग हाेणार नाही. काेणाला काेणत्या उपमा द्यावा याबाबत राणे यांना काेणी काही पक्षातील नेत्यांनी सांगितलेले नाही. विषयाला धरुन केवळ बाेलण्यात यावे. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने पक्षाची प्रतिमा मलीन हाेते. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून आमचा विराेध वैचारिक आहे. नितिमत्तेच्या बाहेर जाऊन वक्तव्यास माध्यमांकडून खतपाणी घातले जाऊ नये. 26 खासदार आमचे राज्यात आहे. विद्यमान लाेकसभा खासदारांना लाेकसभा क्षेत्राची जबाबदारी दिलेली नाही. केवळ निवडणूक तयारी अनुषंगाने जबाबदारी वाटप करण्यात आलेले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

