मुंबई
मुंबईमध्ये दरवर्षी नालेसफाई करूनही पावसाळ्यात पाणी तुंबते. त्यामुळे मुंबईची तुंबई होते. त्याचा फटका सर्वच मुंबईकराना बसतो. यंदाही मुंबईत पूर परिस्थिती उद्भवू नये याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेवून सद्यस्थितीत चालू असलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत संपूर्ण माहिती दिली. नालेसफाईचे केलेले काम आणि त्यातील चुकांबाबत कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आ. अॅड. आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
नुकताच मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाचे खासदार, आमदार, नगरसेवकांसह मुंबई महापालिकेने स्वतः व कंत्राटदारांच्या मार्फत शहरासह, उपनगरातील अनेक ठिकाणी केलेल्या नालेसफाई कामांचा सलग तीन दिवस पाहणी दौरा पूर्ण करण्यात आला. त्यानंतर आज आमदार अँड आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली.
याबाबत बोलताना आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले, शहरातील पावसाच्या पाण्याचा नीट निचरा व्हावा ही मुंबईकरांची गेली वर्षानुवर्षे अपेक्षा आहे. आम्ही यंदाच्या नालेसफाई कामाबाबत असमाधानी आहोत. कंत्राटदार गाळ मोजणीतच हातचलाखी करत आहेत. बहुतांश ठिकाणी कामाचा दर्जा शंकास्पद आहे. आम्ही जे चित्र पाहिले त्यावरून प्रशासनाने सांगितलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षातील वास्तव यामध्ये तफावत दिसते आहे. बहूसंख्य ठिकाणी नुकतीच कामाला सुरुवात झाली आहे. तर अजूनही गाळाचे ढीग नाल्यात दिसून येत आहेत. नालेसफाईबाबत मुंबई करांच्या डोळ्यात कुणी धूळफेक करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण होण्याची गरज आहे, असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.