पुणे : थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद हेमू कलानी यांच्या जन्मशताब्दी निमित्त भोपाळ येथे आयोजित कार्यक्रमात पुण्यातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मनोहर फेरवानी यांना ‘सिंधू गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते मनोहर फेरवानी यांचा गौरव करण्यात आला. भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लाधराम नागवानी, कार्यक्रमाचे संयोजक व मध्यप्रदेश भाजपचे महामंत्री भगवानदास साबणानी आदी उपस्थित होते. मनोहर फेरवानी यांच्या सन्मानाबद्दल पुण्यातील सिंधी समाजाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
भारतीय सिंधू सभेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देशभरातून ४० हजारपेक्षा अधिक सिंधी बंधू-भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सिंधी समाजातील १० व्यक्तींना भागवत व चौहान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. एएनपी केअर फाउंडेशन हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंसाठी मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली जात असून, १७ मशीनद्वारे रोज शेकडो रुग्ण याचा लाभ घेत आहेत. लवकरच येथे कर्करोगावरील किमोथेरपीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मनोहर फेरवानी यांच्यासह कर्करोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुरेश अडवाणी, टेक महिंद्रा ग्रुपचे सीईओ सीपी गुरनानी, पॉली कॅब इंडियाचे संस्थापक इंदर जयसिंघानी, दुबई येथील उद्योजक व समाजसेवी राम बक्षानी, गीतकार महेश चंदर, चित्रपट दिग्दर्शक सतराम रमानी, ग्लोबल सिंधी कौन्सिलचे चेअरमन राम जवारानी, ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी, ग्रामीण शिक्षणासाठी तितलिया संस्थेच्या संस्थापक अनिता गुरनानी यांचा सन्मान करण्यात आला.
मनोहर फेरवानी म्हणाले, “हेमू कलानी यांच्या जन्मशताब्दी निमित्त देशभरातुन आलेल्या सिंधी समाजासमोर झालेला हा सन्मान प्रेरणा देणारा आहे. एएनपी केअर फाउंडेशन हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व समाजातील गरजू रुग्णांना डायलिसिस सुविधा दिली जात आहे. रहाटणी येथे असलेल्या या केंद्रात सकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत संपूर्णपणे मोफत डायलिसिस केले जाते. सामाजिक जाणिवेतून सुरु केलेला हा उपक्रम आणखी विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”