पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी मेक इन इंडियाचे केलेले आव्हान पेलण्याची क्षमता तरूण पिढीत आहे हे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (सीईओपी) मधील विद्यार्थ्यांनी उपग्रह प्रकल्पातून सिद्ध केली आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनातून जागतिक स्तरावर तरूणांच्या मेक इन इंडियासाठीच्या क्षमतेबद्दल विचारल्या जाणा-या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत असे गौरवोद्गार आमदार विजय काळे यांनी आज येथे काढले.
सीओईपीमधील २०० विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी इस्त्रोने मान्यता दिली असून या उपग्रहाचे प्रक्षेपण येत्या २९ एप्रिलला करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल गौरव भारतीय जनता पार्टीच्या शिवाजीनगर मतदारसंघाच्यावतीने आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला. सीओईपीच्या प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमात सीओईपीतील सॅटेलाइट ग्रूपमधील पस्तीस विद्यार्थ्यांचा गौरव “एका दिशेचा शोध” पुस्तकाची प्रत देऊन करण्यात आला. यावेळी या प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. मनिषा खळदकर, सॅटेलाइट क्लबचे समन्वयक डॉ. एस. एल. पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांचे महाविद्यालयातील सहकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले, सॅटेलाइट क्लबचे विद्यार्थी हे आता शास्त्रज्ञ झाले आहेत. शास्त्रज्ञ हे स्वता:चा विचार कधीच करत नाहीत. ते नेहमी त्यांचे संशोधन कसे यशस्वी होईल आणि लोकांच्या उपयोगी कसे पडेल याचाच विचार करतात कारण ते जगासाठी जगत असतात. माझ्या भविष्याचे काय असा केंद्रीत विचार करणा-या आजच्या विद्यार्थी पिढीला तुम्ही उपग्रह तयार करून मार्गदर्शन केले आहे, त्यांना आत्मविश्वास मिळवून देण्याचे काम केले आहे. इंजिनिअर हे निर्माते आहेत. काही तरी निर्माण करण्यासाठी ते उत्साही असतात. तुम्ही विशेषता: या प्रकल्पातील सहभागी विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हा आणि देशाला, महाराष्ट्राला पुढे न्या असे आवाहन त्यांनी केले.
उपग्रह प्रकल्पाचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बी टेकचे शिक्षण घेणा-या धवल वाघुलडे याने काम बघितले. तो म्हणाला, विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण घेतानाच संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी काम केले आहे. त्या सर्वांच्या श्रमाचे सार्थक झाले आहे. त्यावर उपग्रहातून येणा-या पहिल्या सिग्नलने कळस चढेल.
सॅटेलाइट ग्रूपची महिती देताना डॉ. खळदकर यांनी सांगितले की, गेली सात आठ वर्षे उपग्रहाचा प्रकल महाविद्यालयात सुरू आहे. यात एकूण दोनशे विद्यार्थ्यी सहभागी असून प्रत्येक वर्षी नव्याने सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना जुने विद्यार्थी मार्गदर्शन करत आपल्याबरोबर काम करायला लावत असत. ख-या अर्थाने टीमवर्कमधूनच ही निर्मीती झाली आहे. या उपग्रहाचे डिझाइनपासून ते इव्हॅल्युएशनपर्यंतच्या सर्व चाचण्या करून तो 2014 मध्ये बंगळुरूच्या केंद्रात ठेवण्यात आला आहे. येत्या 29 एप्रिलला पीएसएलव्ही 3 या प्रक्षेपकाव्दारे तो अवकाशात सोडण्यात येणार आहे. सुमारे आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत हा उपग्रह स्थिर होऊन त्यानंतर पहिला सिग्नल देईल आणि ही पुणे शहराता अभिमान वाटेल अशीच घटना असेल.
डॉ. पाटील यांनी या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी इतकेच महत्व त्यांच्या आवडीनिवडीला देऊन 33 विविध क्लब स्थापन केले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, त्यापैकीच हा सॅटेलाइट क्लब आहे. या विद्यार्थ्यांच्या इतर अक्टीव्हीटीबद्दल चांगल्या प्रतिक्रिया उद्योग जगताकडून मिळतात. या माध्यमातून एक परिपूर्ण अभियंत्याचे व्यक्तीमत्व घडवण्याचे काम सीओईपीत सुरू आहे.