डॉ. मायकेल सॅन्डरसन यांचे मत; आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे, : “शिक्षणसंस्थांमधील संशोधकांनी उद्योगधंद्यांमधील समस्या सोडवाव्यात. शिक्षणसंस्था- उद्योगधंदे यांच्यातील संवाद साधण्यासाठी हे एक अतिशय सकारात्मक पाऊल ठरेल.” असे उद्गार एल अॅण्ड टी मधील इएचएस मेट्रो आणि संरक्षण या विभागाचे प्रमुख डॉ.मायकेल सॅन्डरसन यांनी काढले. माईर्स एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंट (मिटसॉम), पुणेतर्फे आयोजित केलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग ट्रेन्डस् इन मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी (आयसीईटीएमटी- 2016)या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऑस्ट्रेलियाच्या डेकिन विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अरूण पाटील हे होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने ही आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली आहे.
टाटा ब्ल्यू स्कोप बिल्डिंग सोल्युशन्सचे उपाध्यक्ष डॉ. जॉफ्रे डेव्हिड विल्सन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मिटसॉमच्या संचालिका प्रा.डॉ. सायली गणकर, मिटसॉमच्या एमडीसी आणि रिसर्चचे प्रमुख डॉ. निलेश गोखले, मिटसॉमचे प्रा.गिरीश मुडे आणि प्रा. मनोहर कराडे हे उपस्थित होते.
डॉ. मायकेल सॅन्डरसन म्हणाले, “उद्योगधंद्यामध्ये हजारो समस्या निर्माण होतात पण त्या सोडविण्यासाठी त्यांच्याक़डे वेळ आणि तंत्रज्ञान नसते. शिक्षण संस्थांमधील संशोधकांनी हे काम हाती घेतले तर ते त्यांना अतिशय सोईस्कर ठरते. पण ते व्यावहारिकदृष्ट्या योग्य असले पाहिजे. उद्योगधंद्यांनी ते स्वीकारले पाहिजे. वास्तवात ते सिध्द झाले पाहिजे. यासाठी संशोधकांना त्या समस्येकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन असला पाहिजे. त्यासाठी त्यांना स्वतःची विचारप्रक्रिया थोडीशी बदलावी लागेल. म्हणजेच त्यांना औद्योगिक क्षेत्रातल्या लोकांच्या भूमिकेत शिरावे लागेल. एकदा शिक्षण संस्था आणि उद्योगधंदे यांच्यामधील संवाद प्रस्थापित झाला, की मग दोघेही हातात हात घालून जातील आणि वेगाने प्रगती करतील.”
डॉ. अरूण पाटील म्हणाले, “माझ्याप्रमाणेच तुम्हीसुध्दा शिक्षणक्षेत्रात काम करीत असाल, तर आपण या क्षेत्रातसुध्दा संशोधन करू शकू. यामुळे तुमचे तुमच्या कामातील कौशल्य वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनासुध्दा याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे तुम्ही जर उद्योगधंद्यांमध्ये आपल्या शिकविण्याच्या विषयातील संशोधन करीत असाल, तर त्याचासुध्दा तुम्हाला उपयोग होईल. कारण तुम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाचे प्रशिक्षण देऊ शकाल आणि ते अधिक परिणामकारक असेल. या संशोधनामुळे तुमच्या अध्यापनाचा दर्जासुध्दा उंचावेल.”
डॉ. निलेश गोखले यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.डॉ. सायली गणकर यांनी परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. पल्लवी गेडामकर यांंनी सूत्रसंचालन केले. प्रा.गिरीश मुडे यांनी आभार मानले.

