पुणे-“शुद्ध अचार, शुद्ध विचार,निष्कलंक जीवन, त्याग आणि सहिष्णुता या पाच गुणांच्या जोरावर नवे प्रशासकीय अधिकारी देशात परितर्वन घडविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.,”असे मार्गदर्शन थोर समाजसेवक, लोकपाल आंदोलनाचे अग्रणी, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी यूपीएससी परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग)तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१६ मधील यशस्वितांच्या ९व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे झालेल्या या सोहळ्यात देशातून पहिली आलेली नंदिनी के आर आणि तिसरा आलेला गोपालकृष्ण रोनांकी यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरुप होते. दोघांना अनुक्रमे ५१०००/- व २१०००/- असे रोख पारितोषिकही देण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच,तेलंगणा राज्यातील राचकोंडा येथील पोलिस आयुक्त महेश भागवत, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त व एमआयटी सीएसटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष एन.गोपालास्वामी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) माजी चेअरमन डी. पी. अगरवाल, मेजर जनरल दिलावर सिंग, यशवंत मानखेडकर, अरूण पवार,माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटीसीएसटीचे कार्यकारी संचालक प्रा. सुजीत धर्मपात्रे, मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास, प्रा. गौतम बापट आदी उपस्थित होते.
अण्णा हजारे म्हणाले,“ नव्या प्रशासकीय अधिकार्याची कथनी आणि करनी एक असेल तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. ७० वर्षात देशात जे कार्य झाले नाही ते कार्य चारित्र्यशील अधिकार्यांमुळे १० वर्षात होवून देश उभा राहू शकतो. प्रत्येकाने जीवनात पैशाला अधिक महत्व देण्यापेक्षा जीवनाचे ध्येय निर्धारित करावे. राष्ट्र एक मंदिर आहे, या मंदिरात विराजमान समाज हा भगवान आहे असे समजून प्रत्येकाने या भगवंताची पूजा करावी. गाव, समाज आणि देशासाठी सेवा करण्याची वृत्ती महत्वाची आहे. त्यासाठी मनात सेवाभावी संकल्प यायला हवे, मनात उमटणार्या चांगल्या विचारांमुळे समाजाला दिशा मिळते.”
डी. पी. अगरवाल म्हणाले,“ समाजाकडून तुमच्याबद्दल भरपूर अपेक्षा आहेत. यंत्रणेमध्ये काम करताना अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करावे. आपली निर्णयक्षमता व इच्छाशक्तीच्या जोरावर चांगले प्रशासन येवू शकते. आपले निर्णय समाजाभिमुख कसे असतील, यावर अधिक लक्ष केंद्रित करावे. ”
एन.गोपालास्वामी म्हणाले,“प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करून चांगले प्रशासन निर्माण करावे. सतत नवीन गोष्टी शिकून आपल्या कामाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे आपला अधिक कल असायला हवा.”
मेजर जनरल दिलावर सिंग म्हणाले,“नेशन फस्ट कॅरेक्टर मस्ट, हा मंत्राला अनुसरून देशसेवा करण्याचा सल्ला त्यांनी युवकांना दिला. स्वप्नातील भारत निर्माण करण्याची शक्ती केवळ युवकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी बहुसंख्येने पुढे यावेे.”
महेश भागवत म्हणाले,“ मानव सेवा हीच माधव सेवा असे धोरण अवलंबून कार्य करावे.यूपीएससीमध्ये निवड होण्यासाठी अनेक प्रकारे गुणवत्ता दाखवावी लागते. ”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “विज्ञान आणि अध्यात्माच्या जोरावर देशात परिवर्तनाची लहर आली आहे.जीवनात त्याग, समर्पण करण्यास धर्म शिकवितो. प्रशासनात काम करताना आपली मूल्ये जपली पाहिजेत. भारतीय संस्कृती, परंपरेला अनुसरुन काम केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचे व कठिण परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य तुमच्या अंगी असले पाहिजेे.”
सत्काराला उत्तर देताना नंदिनी के आर म्हणाली,“ प्रेरणा, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त होते. यशप्राप्तीनंतर आपली पाळेमुळे विसरता कामा नयेत. मुलांचा कल जिकडे असेल त्या क्षेत्रात यश प्राप्तिसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन दयावे.”
गोपालकृष्ण रोनांकी म्हणाला, “ यूपीएससी परीक्षेत तिन्ही परिक्षांना खूप महत्व आहे. पूर्व परीक्षा पास झाल्यावर आपल्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. तसेच, पुढील दोन्ही परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे पर्सनालिटी टेस्टला अधिक महत्व आहे. त्यामुळे चहूअंगाने विचार कराण्याची सूचना त्याने युवकांना दिली .”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुजीत धर्मपात्र यांनी आभार मानले.