पुणे: “ योगसाधनेमुळे सकारात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते.
शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगाभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक आजारांना दूर ठेवणे शक्य होते. त्यामुळे सर्वांनी नियमितपणे योगासने केली पाहिजेत,” असा सल्ला योगाचार्य मारुती पाडेकर यांनी दिला.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे तिसर्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून कोथरूड येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यावेळी सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना योगाचार्य मारुती पाडेकर बोलत होते. याप्रसंगी जपान येथील इंडियन रिजन ऑफ शार्प कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक टोमियो इसोगाई, जापनीज कॅलिग्राफर कझुको बारिसिक, जगविख्यात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे व पतंजली योग समिती (महाराष्ट्र पश्चिम विभाग) चे प्रमुख बापू पाडळकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. रामचंद्र पुजेरी यांच्यासह माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हजारो विद्यार्थी या योगासन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेची प्रेरणा देण्याचा संकल्प केला.
मारुती पाडेकर यांनी शिबिरार्थींना योगाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. पाडेकर म्हणाले, “ जगात हा आनंदाचा क्षण आहे. परंतू एमआयटीने हा आनंद १८वर्षांपासून घेण्यास सुरूवात केली. येणार्या काळत डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यामातून संपूर्ण जगाला सुख आणि शांतीचा संदेश दिला जाईल. योगामुळे आध्यात्मिक प्रगती सुद्धा साधली जाईल. किंबहुना योगसाधना हा आध्यात्मिक उन्नतीचाच मार्ग आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदवी पाऊले ! या उक्तीनुसार डॉ.विश्वनाथ कराड यांनी कार्य करून दाखविले आहे. श्वास घेणेसुद्धा एक यौगिक क्रियाच आहेे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ भारतीय संस्कृती, परंपरा आणि भारतीय योगाच्या माध्यमातून खर्या अर्थाने आंतरिक समाधान लाभते. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातू जगाला सुख, समाधान व शांती मिळेल. बुद्ध आणि गांधी यांच्या नावाने सर्व जगात आपला देश ओळखला जातोे.२१व्या शतकात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याचे दायित्व भारताचे असेल. भारतामध्ये पतंजलींसारख्या अनेक ऋषींनी योगाची रुजवण केली. तीच परंपरा बीकेएस अय्यंगार, शेलारमामा आणि रामदेवबाबा यांनी पुढे चालू ठेवली. योगदिनाच्या माध्यमातून तरुणांमध्ये स्वाभिमान व भारतीय अस्मिता जागविण्याचा प्रयत्न होत आहे. श्रध्दा आणि निष्ठेशिवाय खरे ज्ञान मिळू शकत नाही.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ एमआयटीमध्ये गेली अनेक वर्षापासून योगाभ्यास केला जात आहे. आता रामदेव बाबा यांच्या माध्यमातून संपूर्ण जगात योगाचा प्रसार होत आहे. विश्वाला नवस्फूर्ती देण्यासाठी पुढील वर्षी एमआयटी प्रांगणात मोठ्या संख्येने योगासनांचा कार्यक्रम केला जाईल. डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून देशातील शिक्षणक्षेत्रात योगप्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणात केले जाईल.”
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले,“ वैज्ञनिक दृष्टया योगाला खूप महत्व आहे. हे वैद्यकशास्त्राने सिद्ध केले आहे. त्यामुळेच आज सर्व जगातील वैज्ञानिकांनी योगसाधनेचा केवळ स्वीकारच नव्हे, तर स्वागत केले आहे. त्यामुळे जगातील सर्व मानव समाज योगाभ्यास करून आपले आरोग्य उत्तम राखू शकेल. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक दृष्टया तंदुरूस्त बनते. ”
प्रा.अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.


