– पालखी सोहळ्यानिमित्त लोकशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
पुणे : “ भक्तीच्या उत्कटतेचे प्रतीक म्हणजे शुद्ध हेतूने वारीत सहभागी होणे. त्यामुळे १८ दिवसाच्या वारीत प्रत्येक वारकर्याने रोज एक या प्रमाणे स्वतमधील १८ दोषांना दूर करण्याचा संकल्प करावा,”असे आवाहन आळंदी देवाची येथील ह.भ.प.श्री आसाराम महाराज बडे यांनी केले.”
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १५ जून २०१७ ते शनिवार, दि. १७ जून २०१७ या दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्यानिमित्त युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लोकशिक्षणपर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, मुंबई येथील वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष ह.भ.प.श्री रामेश्वर महाराज शास्त्री, सौ. उषा विश्वनाथ कराड, श्री. बाळासाहेब रावडे, डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, पं.उद्धवबापू आपेगांवकर, श्री.गणपतराव कुर्हाडे पाटील, डॉ.जायभाये व इतर मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प.श्री आसाराम महाराज बडे म्हणाले,“ वारी म्हणजे प्रहार-वार आहे. त्यामुळे सदगुणांच्या विचारांनी दोषांवर वार करा. आपल्यातील जे चांगले गुण आहेत, त्यांचा योग्य वापर केल्याने दोष संपतील. भक्तीमध्ये प्रेम क्षणा क्षणाला वाढते. भक्तीत कामना, रजो व तमोगुण नसावे. या संसारात जी गोष्ट आपली नाही, ती आपली मानणे हे चुकीचे आहे. तो गुन्हा आहे. या संसारात दोष पुढे चालतो तर गुणांना दाबले जाते. हरी भक्तीमध्ये दोषांवर संख्यात्मक विचार नाही तर गुणात्मक विचार करावा. मनुष्याने व्यसन आणि विकृतीला सोडावे. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा माऊलीचे हदय आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीतील शिकवण आचरणात आणावी.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“आषाढी वारीचा सोहळा हा लोकशिक्षणाचा सोहळा आहे. माऊलीचा ७०० वा संजीवन समाधी सोहळा १९९६ मध्ये झाला. त्यावेळीच विश्वशांती विद्यापीठाची कल्पना मनात रूजली गेली आणि ती आज साकार झाली. आता भविष्यात आळंदी- देहू हे विश्वशांतीचे केंद्र बनेल. कालानुरूप वारकरी संप्रदायाचे कार्य हे जगभर पसरेल. इंद्रायणी नदीवर घाट निर्मिती आणि विश्वशांती कार्याच्या कामाची दिशा त्यागमूर्ती प्रयागअक्कांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,“या तीर्थक्षेत्राला ज्ञानतीर्थक्षेत्राची ओळख करून देण्याचे अमूल्य योगदान डॉ. विश्वनाथ कराड यांचे आहे. सर्व जातीधर्माचे लोक वारीमध्ये सहभागी होतात, ही एक मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी जातीभेद केला जात नाही. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत. त्यामुळे वारी म्हणजे एक मोठी चळवळच आहे. प्रार्थना, ध्यान,धारणा आणि योग यांच्या माध्यामातूनच सुख, शांती व समाधान मिळू शकते. ”
यानंतर ह.भ.प. श्री. रामेश्वर महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले. पं.जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पं.रमेश रावेतकर, ओंकार गु्रप प्रस्तुत भक्तीरंग हा भक्तीसंगीताचा सुरेल कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमाचा लाभ इंद्रायणी नदीच्या दोंन्ही तीरावरील हजारो वारकर्यांनी घेतला.