पुणे : शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांना मुंबई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ स्मृति प्रतिष्ठानतर्फे समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान ह्रदयेश आर्टस आयोजित दीनानाथ मंगेशकर यांच्या ७५व्या स्मृतिदिन सोहळ्या निमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिह्न व एक लाख एक हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी गानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर, पं. ह्रद्यनाथ मंगेशकर, श्रीमती उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबई येथे श्रीषण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात समर्पित जीवन गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले की, विज्ञान आणि अध्यात्माचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करावयाचा प्रयत्न केला. आज मिळालेल्या पुरस्काराने मला आंतरिक समाधान लाभले. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि ते साकार होतांना दिसत आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे मंगेशकर कुटुंबीय आहेत.
आपल्य अध्यक्षीय भाषणात सरसंघचालक मा. मोहन भागवत म्हणाले की, डॉ.विश्वनाथ कराड यांनी उच्चारलेल्या ङ्गविश्वशांतीङ्घ संकल्पनेला पर्याय नाही. भारतीय संस्कृती ही विश्वकल्याणकारी संस्कृती आहे. संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा विश्वकल्याणाचा उल्लेख केला आहे. जगात परिवर्तन होतांना नकारात्मक भावनेला मागे सारून देश तेजस्वीपणे वाटचाल करीत आहे. भारताने सदैव विश्वकल्याणाचाच विचार संपूर्ण मानवजातीला दिला आहे. या स्वरूपाचे वैचारिक अधिष्ठान मिळाल्याशिवाय समाज खर्या अर्थाने प्रगती करु शकणार नाही.
अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहिल्यास त्यामधून संस्कार व प्रेरणा मिळते, जी सर्वांना आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरते, असे ते म्हणाले. म्हणूनच यानंतर होणार्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असा बहुमूल्य सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
कोणीही पुरस्कारासाठी कार्य करीत नाही तर कलासाधना करून भगवंताची पूजा करतो. तेच कार्य मंगेशकर घराण्याने संगीत क्षेत्रात केले आहे. प्रतिभेचा दिवा लावल्यावर आपोआपच अंधार नाहीसा होईल असेही ते म्हणाले.
यावेळेस प्रसिद्ध गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव, अभिनेता आमीर खान, ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री आशालता वाबगांवकर, गायिका कौशिकी चक्रवर्ती, लेखिका विजया राजाध्यक्ष, समाजसेवक किशोर देशपांडे आणि डॉ. उदय निरगुडकर यांनाही सन्मानित करण्यात आले.
पं. ह्रद्यनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली श्रीखंडे यांनी केले. आदिनाथ मंगेशकर यांनी आभार मानले.

