पुणे: एमआयटी संस्था ही केवळ डिग्री देणारी संस्था नाही, तर देशातील समस्या सोडविण्यासाठी ती एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालयांतर्फे राष्ट्रीय स्तरावर आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७ या स्पर्धेत माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ९ पारितोषिकांनी हे सिद्ध करून दाखविले आहेे. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड यांनी दिली. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ.मिलिंद पांडे, माजी कुलगुरू डॉ. अरूण जामकर,एमआयटीचे प्राचार्य डॉ.एल.के.क्षीरसागर, एमआयटी सीईओईचे संचालक डॉ. आर.व्ही पुजेरी, डॉ. विश्वास देवसकर, डॉ. कृष्णा वर्हाडे हे उपस्थित होते.
भारत सरकारच्या विविध मंत्रालयांतर्फे राष्ट्रीय स्तरावर आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७ या स्पर्धेत माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांनी एकूण ४ लाख ७० हजार रूपयांची ९ बक्षिसे मिळविली आहेत. आपल्या प्रकल्प आणि कल्पनांद्वारे पारितोषिक मिळविणार्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करून त्यांना एमआयटी संस्थेतर्फे रोख रकमेची विशेष बक्षिसे या पत्रकार परिषदेत प्रदान करण्यात आली.
डॉ. मंगेश कराड पुढे म्हणाले की, राज्याची समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन प्रकल्पांवर विशेष कार्य केले तर पुढे जाऊन ते मोठे उद्योजक होऊ शकतात. तसेच समाजाला त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. देशातील समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी तन, मन आणि धनांने केलेल्या प्रयत्नांचे फळ आज मिळाले आहेे. या विद्यार्थ्यांनी देशातील समस्या सोडविण्यासाठी ज्या कल्पाना भारत सरकारच्या पुढे ठेवल्या आणि त्यांची उत्तरे देखिल दिली आहेत, ते कार्य खरेच कौतुकास्पद आहे. हेच विद्यार्थी उद्याचा भारत घडवितील.
भारत सरकारच्या रस्त्ये वाहतूक आणि हायवे मंत्रालयातर्फे स्वयंचलित वाहतूक नियंत्रण या प्रकल्पात माईर्स एमआयटीच्या ईअॅण्डटीसी, संगणक, मॅकॅनिकल, पेट्रोकेमिकल अशा इंजीनिअरींगच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांना एकूण ३.५० लाख रूपयाची रोख पारितोषिके मिळाली. एमआयटी कॉलेज ऑफ इंजीनिअरींगच्या ईअॅण्डटीसी आणि आयटी विभागातील विद्यार्थ्यांना रूपये ६० हजारांची रोख पारितोषिक मिळाली. मिटसॉम कॉलेजला रू. १० हजाराचे रोख पारितोषिक मिळाले. एमआयटी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला तिसरे पारितोषिक रू. ५० हजाराचे मिळाले.
डॉ.मिलिंद पांडे यांनी सांगितले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७ या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ४० हजार संघ सहभागी झाले होते. त्यातील विविध प्रकाराच्या कठिण कसोट्यांना सामोर जाऊन २९ संघांना मिळालेल्या पारितोषिकां पैकी ९ पारितोषिके एमआयटी शिक्षण संस्थातील विद्यार्थ्यांनी पटकाविली. त्याच प्रमाणे १ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री यांच्या समोर एमआयटी सीओईचे विद्यार्थी प्रात्यक्षिक सादर करतील.
माईर्स एमआयटी शिक्ष संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.