पुणे: “आईनस्टाईन सारखा वैज्ञानिकसुध्दा शेवटी अज्ञात शक्तीला मान्यता देतो. वैज्ञानिकांना याबाबतची विशेष कल्पना नसते. पण अध्यात्म मात्र यासंबंधी सखोल स्पष्टीकरण देते. विज्ञानाला विश्वासंबंधी जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते आणि येथेच अध्यात्माची भूमिका सुरू होते. विज्ञानाला जेथे मर्यादा पडतात, तेथून अध्यात्माचा प्रांत सुरू होतो.” असे उद्गार जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.सुबोध पंडित यांनी काढले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानप्रसंगी अध्यात्म आणि धर्म यांचा पुरस्कार करण्यामधील ‘विज्ञानाची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
यावेळी सुप्रसिध्द विद्वान आणि विचारवंत डॉ. एडिसन सामराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण आणि माईर्स एमआयटीचे प्राचार्य डॉ. ललितकुमार क्षीरसागर हे उपस्थित होते.
डॉ. सुबोध पंडित म्हणाले,“हसण्याचा मेंदूवर चांगला परिणाम होतो. जेव्हा एखादी व्यक्ती हसते, तेव्हा मेंदूच्या सर्व भागाला उत्तेजना मिळते. आपल्याला जाणवत नसले, तरी इतकी साधी गोष्टसुध्दा विज्ञानाने सिध्द केली आहे. यावरून विज्ञानाच्या व्यापकतेची कल्पना येईल.’’
“विद्यार्थ्यांनी म्हटले पाहिजे की, हे मला माहित नाही. परंतू ते जाणून घेण्याची माझी तयारी आहे. मी सर्वज्ञ आहे, असा दावा कोणीही करू नये. एखादी घटना कशी घडली, हे जाणून घ्या. त्यावर प्रयोग करा. पण हे लक्षात ठेवा की, परमेश्वर ही सर्वोच्च शक्ती आहे. भौतिक शास्त्र म्हणजे ज्ञान, शांतता म्हणजे सुसंवादाचे प्रकटीकरण, अध्यात्म म्हणजे आत्म्याशी एकरूपता. जेथे प्रज्ञेचा संबंध येतो. धर्म म्हणजे विशिष्ट चौकटीतले अध्यात्म. विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे अर्थातच एकमेकांशी संबंधित असतात.’’
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“विज्ञान आणि अध्यात्म यांच्या भूमिकेबद्दल एमआयटी या संस्थेने सदैव आस्था दाखविली आहे. हा विषय आमच्या ध्येयाशी निगडित आहे. विद्यार्थ्यांनी आपपरभाव न ठेवता सर्व धर्मग्रंथांचा परिचय करून घेतला पाहिजे. कारण खरे म्हणजे ते जीवनग्रंथच आहेत. आपण काय करावे व काय करू नये याचा संदेश ते देत असतात.’’
प्रा.डॉ. एल.के. क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एडिसन सामराज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस.एन.पठाण यांनी आभार मानले.