श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिरा’ची वचनपूर्ती
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे मंदिराची माणा गावात उभारणी
पुणे:“भारतीय संस्कृतीमध्ये गंगा दर्शनाची प्रथा आहे. तीर्थ यात्री घरी परततांना त्यांचे दर्शन घेण्याची आपली संस्कृती आहे. वैश्विक संस्कृतीची सुरूवात सरस्वती नदीच्या मुखातून होते. सरस्वती नदीच्या उगमापासून भारतीय संस्कृतीचा प्रवाह प्रवाहित होऊन जगाला, सुख, शांती, समाधान, विद्या आणि ज्ञान आत्मसात करण्याची शक्ती देते.” असे उद्गार जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी काढले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंडातील बद्रिनाथ धाम येथील माणा गावात उभारण्यात आलेल्या ‘श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिरा’ची निर्मिती करून वचनपूर्ती केली. या संदर्भात आयोजित पुणे रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या परिषदेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, अमेरिकेतील सुप्रसिद्धा शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास, ह.भ.प.श्री. बापूसाहेब मोरे देहूकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड चाटे, तळेगाव येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्याकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नागरे हे उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ महर्षी वेद व्यास यांनी याच नदीच्या मुखातून ज्ञान संस्कृतीद्वारे मानवी विचार प्रवाहित केले. जगात अनेक संस्कृती आहेत, मात्र, हजारो वर्षापासून जगाला ज्ञानाचा प्रकाश केवळ भारतीय संस्कृतून मिळत आहे. उत्तराखंड येथील माणागावा जवळ सरस्वती नदीच्या उगमावर विद्येची देवता श्री.सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. यांनी या मंदिराची उभारणी केवळ ६३ दिवसांमध्ये पूर्ण करुन नवा अध्याय रचला. भविष्यात येथे येणारे प्रत्येक श्रद्धाळू जगात भारतीय संस्कृतीची महंती सांगेल.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ माणा गाव हे ईश्वरी शक्तीच प्रतीक आहे. महर्षी वेद व्यासांची गुफा ही भारतीय संस्कृतीच दर्शन घडविते. हजारो वर्षापासून प्रथा, परंपरा, ज्ञान यातून याच शतकाच ज्ञानच दालन म्हणून उदयास येईल. सरस्वती नदीच्या मुखातून निर्माण केलेल श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर जगाला सुख, शांती, समाधान याचा संदेश देईल. अध्यात्म हे अंधश्रध्दा नसून एक जीवन जगण्याचे शास्त्र आहे. भारताचे शेवटचे टोक असलेल्या गावात हे मंदिर निर्माण केले आहे. जगातील सर्व विद्यापीठांना ज्ञानाचा संदेश देण्याचे कार्य येथून होईल. मानव निर्मित सर्व अस्त्र हे विनाशकारी आहेत. मात्र अध्यात्म हेच मानव कल्याणाचे खरे साधन आहे. सरस्वती नदीच्या उगमापासून वैश्विक संस्कृतीची सुरूवात होत आहे. भारताची प्रतिमा विश्व गुरू म्हणून उभी राहत आहे. देवभूमीतून विद्या आणि ज्ञानाचा मार्ग जगाला विश्व कल्याणाचा संदेश देईल.”
डॉ. विजय कुमार दास म्हणाले,“भारतीय संस्कृती अध्यात्म, ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान यांच्या समन्वयातून तयार झाली आहे. भारत म्हणजे भा मध्ये रथ अशी संकल्पना आहे. हे मंदिर ज्ञानाचे स्थान आहे. ज्ञानशिवाय शक्ती आणि यश मिळू शकत नाही. ज्ञानामुळेच जगात शांतता प्रस्थापित होईल. अमेरिकासारख्या देशाने ज्ञानाच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे. आता भारतही ज्ञानाच्या माध्यमातून विश्व गुरु म्हणून उदयास येईल. ”
ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे देहूकर आणि श्री. बाळासाहेब बडवे यांनी आपले अनुभव कथन केले.
तसेच या पत्रकार परिषदेत माणागावा येथे जाऊन दर्शन घेणारे वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमआयटीने दाखविली सामाजिक बांधिलकी
एमआयटीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माणा गावात ७ दिवस चुल बंद करुन संपूर्ण गावातील लोकांना अन्नदान केले. त्याच प्रमाणे येथील ५०० वस्तीच्या या गावातील प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यातील महिलांना साड्या, पुरूषांना ड्रेस आणि लहान मुलांना त्यांच्यानुसर ड्रेस वाटण्यात आले. येथे आयोजित सप्तहाच्या समारोपच्या दिवशी बद्रिनाथ व माणागावात महाप्रसाद वाटण्यात आले.