खरा माणूस तोच जो स्वत:सह राष्ट्र व समाजासाठी उपयोगी-रामदेव बाबा
पुणे : “आज जर भारतातील तरुणाईवर विश्वास ठेवला तर आपण देशातच नव्हे तर जगावर देखील राज्य करु. याच तरुणाईसाठी पतंजली द्वारा जगातील सर्वात मोठे विश्वविद्यालय सुरु केले जाणार असून या ठिकाणी मुले तंत्रज्ञानासोबतच गीता, कुराण आणि गुरु ग्रंथसाहिब यासारख्या सर्व धर्मग्रंथांचे धडे घेतील. कारण खरा माणूस तोच आहे, जो स्वत: सह समाजाला व राष्ट्राला उपयोगी पडेल, असे सडेतोड मत योगगुरु रामदेवबाबा यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या भारतीय छात्र संसदेच्या सहाव्या सत्रात ते बोलत होते. बहुराष्ट्रीय कंपन्या : तारक की मारक या विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी कर्नाटक विधानसभेचे सभापती श्री. डी.एच. शंकरमूर्ती, केरळ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.के. राधाकृष्णन, आंतराष्ट्रीय ख्यातीचे लेखक व वक्ते श्री. शिव खेरा, गांधी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. तुषार गांधी, रामकुमार राठी, हरिभाई शहा, सिद्धार्थ शिरोळे, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रामदेवबाबा म्हणाले, “आज आपण सगळेजण वेगेवेगळा धर्म सांगतो, मात्र आपले पूर्वज एकच आहेत. त्यामुळे आपण सगळे एकच आहोत. आज युवक अनेक चुकीच्या गोष्टींच्या आहारी जातात. युवकांनी फुलापेक्षाही कोमल आणि वज्रासारखे कठीण बनायला हवे. युवकांचे स्वत:च्या शरीरावर तसेच, मनावर नियंत्रण अत्यंत गरजेचे आहे. युवकांकडे सकारात्मक दृष्टीकोन गरजेचा आहे. हल्ली मला विचारल जातं की, पतंजलीची जीन्स देखील येणार आहे का? तर माझे उत्तर असते की का नसावी? जर आज भारत संपूर्ण जगाला 60 ते 70% कापड पुरवत असेल तर नक्कीच भारत पतंजलीच्या माध्यमतून आपला ब्रॅण्ड तयार करेल. आज अनेक विदेशी कंपन्या भारतात येतात. त्यांचे भारतावर, इथल्या लोकांवर प्रेम आहे म्हणून नाही तर येताना फक्त काही रुपये आणायचे आणि त्याच्या हजारपटीने नफा कमवायचा म्हणून ते येतात.
आज हे देखील कबूल करावे लागेल, की आपण विदेशातून त्यांचे तंत्रज्ञान घेऊ पण त्यांच्याएवजी आपले स्वत:चे प्रोडक्ट तयार करु. साबण, शॅम्पू, तेल हे बनवायला कसले तंत्रज्ञान लागते? उलट त्याच्या नावावर आपल्याला विदेशी कंपन्या मुर्खात काढत असतात. जर तुम्ही तुमच्या घरासाठी, परिवारासाठी वाट्टेल ते करता अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या भारतासाठी काहीही करण्यास तयार आहे, त्यामुळेच मी एक फक्कड संन्यासी आहे. आज जर भारताने पाकिस्तानची गरिबी हटवली तर तो कधीच भारताचा शत्रू नसेल. गरिबीमुळेच युद्धे होतात, तीच गेली तर लोक युद्धाएवजी योगा करतील. ”
श्री.डी.एच शंकरमूर्ती म्हणाले, “आज आपल्याला जागतिकीकरणाआधी गुंतवणूक आणि उद्योगांची गरज आहे. जागतिकीकरणाला माजा पूर्णतः विरोध असेल. कारण ते आपले सगळे स्त्रोत जवळपास संपवून टाकतील. मला नेहमी प्रश्न पडतो की, विदेशी कंपन्या इथे नेमक्या कशासाठी येतात. माझ्या देशाचा विकास करण्यासाठी की फक्त पैसा कमावण्यासाठी. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कारण आता भारताचे आर्थिक समिकरण बदलले आहे. ”
प्रा.पी.के.राधाकृष्णन म्हणाले, “1991 पर्यंत भारतीय अर्थकारणात विदेशी कंपन्यांची भूमिका अगदी नगण्य होती. विदेशी गुंतवणुकीचा कोणत्याही अर्थकारणावर सकारात्मक व नकारात्मक असा दोन्ही बाजूनी परिणाम होतो. यामुळे संपत्तीसह नोकरी मिळतेच सोबतच तुमचा जगण्याचा स्ट्रँडर्डही वाढतो. ”
यावेळी आदर्श युवा विधायक पुरस्काराने गुजरातच्या आमदार श्रीमती संगीताबेन पाटील, हरियाणाच्या आमदार कविता जैन यांना सन्मानित केले गेले. तसेच नागपूर विद्यापीठाच्या मराठीच्या प्राध्यापिका. डॉ. झुल्फी शेख आणि सामजिक कार्यकर्ते व विचारवंत मौलना सइद कल्बे रशिद रिझवी यांना आध्यात्मिक जनजागृती पुरस्काराने सन्मानित केले गेले. यासोबतच श्री. सुभाष पालेकर यांना कृषी योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी जय जगताप (महाराष्ट्र), लोविश जैन (राजस्थान), सायली तुमराम ( महाराष्ट्र), सार्थक अग्रवाल (उत्तर प्रदेश), रुतुजा सांगळे (महाराष्ट्र) या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
शिव खेरा म्हणाले, “आज देशामध्ये जातीवर आधारित दिले जाते. मात्र जात-पातीपेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण देणे गरजेचे आहे. खरा गरीब असेल तर त्याला आरक्षण मिळून त्याचा फायदा होऊ शकतो. ”
मॉन्टेक सिंग अहलुवालिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा आपला संदेश देताना म्हणाले, आज आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणत्याही विदेशी कंपन्यांना आपण आपले दरवाजे बंद करु शकत नाही. आपल्या भारतीय कंपन्यांनी मल्टीनॅशनल बनण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्पर्धा करण्यापेक्षा आपला दर्जा उच्च ठेवला पाहिजे.
श्रीमती नीलम शर्मा आणि प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.