काळा पैसा ही एक वाईट मानसिकता -एन. गोपालस्वामी
पुणे दि. 19 : “ काळापैसा ही एक वाइट मानसिकता बनली आहे, जी तुम्ही अणि मी जन्माला घातली आहे. अंमलबजावणी ही फक्त एकच गोष्ट आहे जी त्याला रोखु शकते. आज निवडणुका म्हटले की काळा पैसा असे समीकरण झाले आहे. मात्र आज काळा पैसा संपवण्यासाठी स्वत:ची मानसिकता बदलने गरजेचे आहे.“ असे मत माजी मुख्य निवडणुक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या भारतीय छात्र संसदेच्या पाचव्या सत्रात काळा पैसा आणि निवडणुका : मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? या विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी जम्मू काश्मिर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. आर.डी. शर्मा, तिबेटचे पंतप्रधान लोबसंग संगे, गांधी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार गांधी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, भारताचे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, नागालँड विधानसभेचे सभापती श्री. छोटीसुह साझो, ओरिसाचे आमदार श्री. अनुभव पटनाईक, काँग्रेसचे प्रचार सल्लागार श्री. शशांक शेखर शुक्ला, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ओरिसाचे आमदार अनुभव पटनाईक व जम्मू-काश्मीरचे आमदार विकार रसूल वाणी यांना आदर्श युवा आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले.
एन. गोपालस्वामी म्हणाले, “काळापैसा हा फक्त निवडणुकांशी संबंधीत नाही परंतू हे ही तितकेच सत्य आहे की काळ्या पैसा हा मोठ्या प्रमाणात निवडणुकांमध्येच वापरला जातो. जर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी संबंधीत प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आम्ही दोन दशकांचा अवधी घेत असू तर काळ्या पैशांच्या अंमलबजावणी बाबत बोलायलाच नको. आपल्याकडे एक काळ असाही होता जेंव्हा मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री देखील बसने प्रवास करायचे. ज्यांनी चांगुलपणाचा एक पायंडा घातला होता. पण आज हे चित्र पुरते बदलले असून राजकारणाइतका दुसरा उत्तम धंदा शोधुनही सापडणार नाही.
एस. वाय. कुरेशी म्हणाले, सगळेच राजकीय पक्ष हे भ्रष्टाचारी नाहीत परंतू बरेच जण त्यात बरबटलेले आहेत. राजकारण म्हणजे मनी एन्ड मसल पॉवर हे समीकरण बनले
आहे. लोकसभा व विधानसभेच्या समांतर निवडणुका या भारतासाठी अतिशय योग्य समीकरण बनु शकते. परंतू त्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्ती आणि घटना दुरुस्ती गरजेची आहे.
नरेंद्र जाधव म्हणाले, राजकीय पक्ष, उद्योजक, स्वयं कामगार व प्रशासन हे काळ्या पैसा निर्माण होण्याचे प्रमुख स्त्रोत बनले आहेत. भारतामध्ये दीड हजरपेक्षा जास्त राजकीय पक्ष असून त्यापैकी फक्त पन्नासच्या आसपासच राजकीय पक्ष निवडणुका लढवतात आणि बाकीचे इतर पक्ष फक्त काळापैसा वहनाचे काम करीत आहेत.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नीलम शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी केले.