पुणे, २५ जून: “ वारीमुळे काया, वाचा, मन आणि बुध्दी शुध्द होते. त्यामुळे आपण देवाशी एकरूप होतो. हे सर्व संत संगतीने घडल्याने आपण सर्व प्रापंचिक विवंचना विसरून जातो. त्यामुळे देवाला भेटण्याचा तो खरा राजमार्ग.”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प.बबनराव पाचपुते यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थानाच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कांग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरूण जामकर, पं. उध्दवबापू आपेगावकर, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे, ह.भ.प.श्री. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणकर, ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, ह.भ.प. शालीग्राम खंदारे आणि ह.भ.प. नलावडे महाराज हे उपस्थित होते.
ह.भ.प.बबनराव पाचपुते म्हणाले,“ या सृष्टीवरील सर्वश्रेष्ठ सत्य हे मृत्यू असल्याने घाबरू नका, ते आज नाही तर उद्या येणारच आहे. अशावेळेस संतांच्या संगतीत राहून सत्कर्म करीत रहा. हे शरीर परोपकारासाठी आहे हे ही विसरू नका. वारकर्याने आचार, विचार, आहार आणि विहार शुध्द ठेवल्यास परमार्थ लवकरच मिळतो. मानसाच मन हे लोखंडासारखा झाल आहे. जो पर्यंत त्याला वैराग्याने तापविणार नाही तो पर्यंत त्याला आकार देता येणार नाही. ईश्वराकडे जाण्यासाठी मन मोकळे ठेवावे लागते.”
ह.भ.प. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणकर म्हणाले,“ संत सदैव आत्मसुख देऊन दुखःचे निवारण करतात. संतांचे सौदर्य हे त्यांच्या चरणी असते. त्यामुळे वारकर्यांनी संतांच्या चरणी शरण जावे, संतांच्या विचारांची सेवा करावी, त्यांच्या विचारांना आचरणात आणावे, संत जो मार्ग दाखविले त्यावर चालावे, वारकर्यांनी साधनेसाठी दृढ व्हावे आणि संतांप्रमाणे परोपकारी व्हावे. सर्व वारकर्यांना आळंदीला येण्याचे कारण हेच आहे की येथे माऊलीची ऊर्जा मिळते. तसेच वारकर्यांनी संताच्या ऐवजी विठोबाचे मंदिर बांधा आणि संतांना ग्रंथात शोधा.”
उल्हास पवार म्हणाले,“आपल्यातील अहंकार कमी करण्यासाठी सर्वांनी वारी ही केलीच पाहिजे. यामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्तीचा संगम होतांना दिसून येतो. तसेच, यातून अध्यात्माची आणि तत्वज्ञानाची अनुभूती मिळते.”
यानंतर वै.ह.भ.प. दादामहाराज साखरे फडाचे प्रमुख व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे आणि संपदा थिटे व सहकारी यांनी राजा परांजपे प्रतिष्ठान निर्मित अभंगरंग हा कार्यक्रम सादर केला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांनी केले. ह.भ.प. शालीग्राम खंदारे यांनी आभार मानले.
वरील कार्यक्रमाचा इंद्रायणीच्या दोन्हीही तीरावरील लाखो वारकर्यांनी अध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला.