एमआयटीतर्फे आयोजित ‘अभिनेता म्हणून झालेला माझा प्रवास’ मध्ये विशेष मुलाखत
पुणे- तुम्ही कोणाचाही आदर्श घेण्याची जरूरी नाही. स्वतःच स्वतःचा आदर्श व्हा, तुमची स्पर्धा स्वतःशीच असली पाहिजे. ज्यात आनंद मिळेल अशीच गोष्ट करा आणि त्यात भरपूर शिका व परिश्रम करा. त्यामुळे आनंद व यश दोन्हींमुळे नाही तरी कोणत्याही क्षेत्रात गेलात, तरी तुम्हाला परिश्रम घ्यावेच लागतात. असा सल्ला प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना दिला.
निमित्त होते माईर्स एमआयटीच्या मेकॅनिकल इंजिनियरिंग विभाग आणि असोसिएशन ऑफ स्टूडन्ट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनियरिंगतर्फे आयोजित ‘अभिनेता म्हणून झालेला माझा प्रवास’ या मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या मुलाखतीचा. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतांना त्यांचे विविध पैलू समोर आले.
पुण्याच्या बालनाट्य संस्थेच्या माध्यमातून अभिनयाची कारकिर्द सुरू करता-करता पुरूषोत्तम करंडक मिळविण्यासाठी प्रयत्न करताना त्याना आपल्या स्वतःमधील अभिनेत्याचे दर्शन झाले. आयुष्यातील महत्वाच्या वळणावर म्हणजेच १२वीं सायन्यमध्ये मी नापस झालो. तोच माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता. त्यामुळेच आज मी येथवर पोहोचलो, अशी कबुली सुबोध भावे यांनी दिली. पुरूषोत्तम करंडक स्पर्धा हेच माझ्यासाठी अभिनयाचे धडे देणारे विद्यापीठ होते. नंतर कॉमर्सचे शिक्षण घेतांना केलेल्या घडपडीत रंगमंचाने मला खूप काही शिकविले. ‘चंद्रपुरच्या जंगलात’ या नाटकासाठी बरेच परिश्रम घेतल्यानंतरही पुरूषोत्तममध्ये हवे असे तसे यश मिळाले नाही. पण एड्स विषयावर आधारित असे हे नाटक आम्ही जेव्हा इतर कॉलेजेस, सामाजिक संस्था आणि जेलमध्ये सुद्धा केल्यानंतर रंगमंचावरील आलेला अनुभव हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंंट ठरला.
अहोरात्र अभिनयाची नशा असल्यामुळे नोकरीचा राजिनाम दिल्यानंतर नैराश्य न येता याच क्षेत्रात संघर्ष करीत राहण्याचा निर्णय घेतला. संघर्षा शिवाय जीवनात काहीच मिळत नाही हा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.
‘व्हेलेंटाइन डे’ निमित्त आपल्या जीवनाची प्रेमकथा उलगडतांना सुबोध भावे म्हणाले, बालनाटक करतांना मी १०वीं होतो तर नंतर इंजिनियर झालेली माझी पत्नी मंजिरी ही ८वींत होती. त्यावेळेसच मी तिला प्रपोज केले. त्यानंतर ११९१ पासून अगदी आजपर्यंत आमचे अफेअर सुरूच आहे. आमच्या दोन मुलांचा सांभाळ करून मंजिरी पूर्णपणे कान्हाज प्रॉडक्शनची जवाबदारी सांभाळून सृजनात्मक कार्य करीत आहे.
बालगंधर्व व लोकमान्य या चित्रपटाच्या माध्यमातून हुबेहुब व्यक्तिरेखा करणारे सुबोध भावे यांनी नाटक कट्यार काळजात घुसली या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाची जवाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात विशेष रूची उत्पन्न झाल्यामुळे पं.भीमसेन जोशी, जितेन्द्र अभिषेकीबुवा, राहुल देशपांडे व महेश काळे यांचे गायन रोज ऐकतो. खंत एकच आहे, की आईने लहानपणीच सांगितले होते की संगीत शीक.
गूढकथा, परीकथा, थ्रिलर या सारख्या वेगवेगळया विषयांची आवड असल्यामुळे राजन खान, ग.दि. मा, विश्वास पाटील, सुहास शिरवळकर सारख्या लेखकांची पुस्तके वाचतांना विशेष आनंद मिळतो. त्यामुळे विचारांना चालना मिळते. ती तुम्हाला पुढे घेऊन जाण्यास प्रेरणा देत असते.
या वेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, असोसिएशन ऑफ स्टूडन्ट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सचिव रितेश देवकर, प्रा.डॉ. सुहासिनी देसाई व प्रा. सुधीर राणे उपस्थित होते.
सोशल मीडिया हे साफ खोटे आहे. त्यावर काहीही लिहिल जाते. त्याचा परिणाम हा समाजात वाईटच दिसतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने देशातील कायदे न पाळणारा हाच खरा दहशतवादी आहे. प्रत्येकाने माणसे जोडावीत. तोडू नयेत. रोजच्या जीवनात साधे साधे नियम पाळले तरी जीवन सुखमय बनेल. सर्वांनी सिग्नलच्या नियमांचे पालन केले तरी मोठ्या प्रमाणात हानी टळेल.

