शेतकरी आठवडे बाजार व ग्रामीण फुड कार्निव्हलचे
नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पुणे: हृदयरोग, लठ्ठपणा, श्वसनाचे विकार, त्वचा रोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, आतड्याचे विकार आदी सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी, त्यावरील शस्रक्रिया व औषधोपचार मोफत असणारे महाआरोग्य शिबिर येत्या शनिवार व रविवारी (17 व 18 फेब्रुवारी) पुण्यातील बालेवाडीमध्ये होत आहे. त्यासोबतच थेट शेतकऱ्यांचा ताजा शेतीमाल शहरातील नागरिकांना मिळावा व त्यांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडावे यादृष्टीकोनातून शेतकरी आठवडे बाजार व ग्रामीण फूड कार्निव्हलचे आयोजनही करण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट व खासदार संजय काकडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आयोजक व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.
नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाउंडेशन, बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशन आणि पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य शिबिर आणि अमोल बालवडकर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि स्फूर्ती ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी आठवडे बाजार व ग्रामीण फूड कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बालेवाडी येथील दसरा चौकातील संजय फार्म येथे येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता याचे उद्घाटन होणार आहे. महाआरोग्य शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असणार आहे. तर, बाजार व फूड कार्निव्हल सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी 2017 चा विजेता अभिजीत कटके याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असेही नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले.
महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, सर्व प्रकारची चाचणी, औषधोपचार तसेच सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या आरोग्य शिबिरामार्फत नागरिकांना सर्व सुविधा मोफत पुरविल्या जातील तसेच योग्य उपचार केले जातील, असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले. यावेळी मोफत अवयवदानाचे फार्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
प्रत्येक शनिवार व रविवारी शेतकरी आठवडे बाजार व ग्रामीण फूड कार्निव्हल!
बालेवाडीतील साई चौकात प्रत्येक शनिवारी व रविवारी शेतकरी आठवडे बाजार भरणार आहे. हा आठवडे बाजार प्रत्येक शनिवार व रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. प्रभागातील नागरिकांसाठी थेट शेतकऱ्यांचा शेतीमाल मिळणार आहे. तसेच, खास खवय्यांसाठी ग्रामीण फूड कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे थेट शेतकऱ्याला पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. ग्रामीण खाद्य पदार्थांची विक्री होणार आहे. यासोबतच मनोरंजनासठी घोडागाडी, बैलगाडी व उंटावरील सफारी तर, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोष्टींबरोबरच नंदी बैल, वासुदेव यामध्ये असणार आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून हे काम केले जाणार असल्याने महिलांनाही रोजगार मिळणार आहे, असेही नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.