एमआयटी-डब्ल्यूपीयू तर्फे‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा
पुणे : “ देश स्वतंत्र होऊन आज ७० वर्ष झाली, तरी आजही समाजात अज्ञान व अंधश्रद्धा यांनी थैमान घातले आहे. तरूण पिढीने मनावर घेतले, तर हे चित्र पालटू शकेल. निदान माझ्या हयातीत तरी तसे घडलेले पाहवयास मिळेल. अशी मला आशा आहे.” अशी भावना भारतीय खगोल शास्त्रज्ञ व आयुकाचे संस्थापक व माजी संचालक पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेे, भारत अस्मिता फौंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळ्यातील ‘भारत अस्मिता तंत्र-विज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर डॉ. नारळीकर बोलत होते.
सुप्रसिद्ध व्यवस्थापन शिक्षक व सल्लागार श्रीमती रमा बिजापूरकर यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’. भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व हिंगोलीचे खासदार श्री. राजीव सातव यांना ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार’, पं. राजन व पं. साजन मिश्रा यांना ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ तसेच, मनोज जोशी यांना ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना ‘भारत अस्मिता तंत्र-विज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. स्मृतिचिह्न व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
ज्येष्ठ संगणक तज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टिम प्रा.लि.चे अध्यक्ष श्री. नानिक रूपानी आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटीडब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.डी.पी.आपटे, एमआयटीडब्ल्यूपीयूच्या मॅनेजमेंट (पीजी)च्या अधिष्ठाता प्रा.डॉ. सायली गणकर, एमआयटीडब्ल्यूपीयूच्या मॅनेजमेंट (यूजी)चे डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल.के.क्षीरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जयंत नारळीकर म्हणाले,“ पारतंत्र्याच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांना असे वाटत होते, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण येथे विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती करू. त्यांनी पंतप्रधान या नात्याने बरीच पावले उचलली. पण, या देशातल्या जुनाट रूढी व अवैज्ञानिक परंपरांवर मात करणे त्यांना शक्य झाले नाही. खरे म्हणजे ही जबावदारी आपणा सर्वांचीच, विशेषकरून सुशिक्षित लोकांची आहे. पण ते सुद्धा त्याच्याच आहारी जाताना दिसून येत आहेत.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भारतीय परंपरेला अध्यात्माची बैठक आहे. त्यामुळे भारतात १४ विद्या आणि ६४ कलांना महत्व आहे. या देशाला सुरूवातीपासून ज्ञानाची परंपरा लाभलेली आहे. या देशाची संस्कृती ही एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळे विश्वात शांती निर्माण करण्यासाठी भारत महत्वपूर्ण भूमिका बजावेल.”
श्रीमती रमा बिजापूरकर म्हणाल्या, “ सर्वात मोठी गुरू दक्षिणा म्हणजे शिष्याला दिल्या गेलेल्या ज्ञानाची सतत उन्नती करणे. त्या साठी सतत ज्ञानाविषयी उत्सुकता असावयास हवी. सतत नाविन्याचा ध्यास असायला हवा. तसेच,हे कार्य सातत्याने करायला हवे. त्याचप्रमाणे सदैव क्रियाशील राहणेसुद्धा महत्वाचे आहे.”
राजीव साताव म्हणाले, “ या देशात सॅम पिट्रोडा आणि डॉ. विजय भटकर यांनी कम्प्यूटर व डिजिटल क्रांति आणून देशाचा कायापालट केला. या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक युवकाने कोणत्या ना कोणत्या पक्षात सामील झाले पाहिजेे. या दृष्टीने युवकांनी मनात पक्का विचार केला तर हा देश प्रत्येक क्षेत्रात उंची गाठेल.”
मनोज जोशी म्हणाले,“शिक्षक हा साधारण नसतो त्याचाजवळ निर्मिती आणि प्रलय या दोन्हीही करण्याची शक्ती असते. भारत भूमीमध्ये राष्ट्र सेवेपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. त्यामुळेच राजनीतीमध्ये नीती हाच शब्द योग्य आहे. त्यात कल्याण आणि दंड या गोष्टी समाविष्ठ आहेत.”
पं. राजन व पं. साजन मिश्रा म्हणाले, “भारतीय शिक्षण पद्धतीतून स्पर्धा संपविण्यात आली तर प्रतिभाशाली विद्यार्थी पुढे येतील. ज्ञानाने परिपूर्ण होण्याचा व चांगल्या मार्गावर चालण्याचा सल्ला शिक्षक देत असतो. परंतू, गुरू हा तुमचा अहंकार नाहीसा करून तुम्हाला ओल्या माती सारखे करून नंतर तुम्हला योग्य आकार देतो.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“नव्या पिढीला दिशा देण्याचे कार्य भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून होत आहे. विज्ञान आणि अध्यत्माच्या समन्वयातून निर्माण होणार्या पिढीच्या माध्यमातून भारत देश विश्व गुरू बनण्यास वेळ लागणार नाही. २१व्या शतकात भारत हा जगाच्या ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि या जगाला शांतीचा मार्ग दाखवील. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांच्या द्वारे भारतीय तरुणांमध्ये भारतीय अस्मिता जागविण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे.”
नानिक रूपानी म्हणाले,“ भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारा ऐवजी प्राईड ऑफ इंडिया हा शब्द योग्य अर्थाने शोभून दिसेल. कारण येथे ज्यांचा सत्कार होत आहे, ती देशातील महान व्यक्तिमत्वे आहेत. विश्व शांतीसाठी एमआयटी संस्थेने चालविलेले उपक्रम अद्वितिय आहेत.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांमागील पार्श्वभूमी विशद केली. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सायली गणकर यांनी आभार मानले.


