पुणे : “मला प्रतिकूल परिस्थितीशी सतत सामना करावा लागला. पण त्यामुळेच मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली. विशेष म्हणजे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात पुण्याने मला आधार दिला.” असे उद्गार भारतीय अॅथलेट व रिओ पॅरालिंपिक गोळाफेक स्पर्धेतील सिल्व्हर मेडल विजेती दीपा मलिक यांनी काढले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व रोटरी (रो.) क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी, पुणेचे अधिष्ठाता प्रा.शरद्चंद्र दराडे-पाटील हे होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे प्राचार्य प्रा.डॉ. एल.के.क्षीरसागर, रोटरी क्लब ऑफ पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष देव शहाणे, रो. प्राची धरमसी, रो.सुजाता कुलकर्णी, रो. महेश भागवत, रो. पल्लवी देशपांडे व एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणेचे प्राचार्य डॉ. एम.एस.नागमोडे हे उपस्थित होते.
दीपा मलिक म्हणाल्या, “माझ्या लहानपणीच मला पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये 3 वर्षे अॅडमिट करून उपचार दिले जात होते. माझ्या अवतीभवतीच्या सर्व लोकांनी मला निरनिराळ्या यशोगाथा ऐकविल्या. त्यामुळे मला त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य दिले. त्यातून मला कोणत्याही परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पहावयास शिकविले व नंतर संपूर्ण आयुष्यभर ती माझी एक सवयच बनली. माझे वडील सैन्यदलात होते आणि मला वर आणण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. आज माझ्या शरीरातील जवळजवळ बरेचसे अवयव निकामी झाले आहेत. पण त्यातूनही यशाकडे जाण्यासाठी मी धडपड करते.”
“माझे जेव्हा खांदे दुखत होते तेव्हा मला असे सांगण्यात आले की, तुम्ही पोहण्याचा सराव करा. त्यातूनच तुमची प्रकृती सुधारू शकेल. त्याने माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण दिले. या दिशेने मी कशी प्रगती करू शकेल, याबद्दल मी विचार करू लागले. पॅरालिंपिक हा शब्द माझ्या कानावर पडला आणि त्याने माझ्यापुढे एक स्वप्न उभे केले. सर्वांना माहीतच आहे, की मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदके मिळविली आहेत. या सर्वांमागील मुख्य प्रेरणास्त्रोत म्हणजे मनाचा निश्चय हा आहे. मी सौंदर्यस्पर्धेमध्ये सुध्दा भाग घेतला आणि विजेती ठरले.”
“प्रत्येक व्यक्तीने, विशेषकरून विद्यार्थ्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार आहात. यश मिळविण्यापासून जगात कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही. कोणतेही संकट किंवा प्रतिकूलता ही यशाकडे जाण्याची एक संधी असते. तरूण वर्गाने हा संदेश घेऊन पुढे जावे.”
प्रा.शरद्चंद्र दराडे-पाटील म्हणाले, “दीपा मलिक या भारतीय तरूणांच्यापुढील किंबहुना सर्व जगासमोरील आदर्श आहेत. कुसुमाग्रज व बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या कवितांमधून हेच सांगितले आहे.”
प्रा.डॉ. एल.के.क्षीरसागर यांनी स्वागतपर भाषण केले.
रो.देव शहाणे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली.
रो.सुजाता कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
रो.सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. रो.पल्लवी देशपांडे यांनी आभार मानले.

