पुणे-
अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट आणि अभिषेक साप्ते स्मृती फाऊंडेशनतर्फे शंकरराव साप्ते यांच्या स्मरणार्थ ह. भ. प. मंगला फुके यांना माऊली पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार ,माजी उपमहापौर दीपक मानकर, अशोक कोकाटे, चंद्रकांत सणस, माजी नगरसेवक दत्ता सागरे, अशोक जाधव, दिपक साप्ते, पंडितराव रोकडे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्कारचे स्वरुप होते.
दीपक मानकर म्हणाले, वारीमधून आचार-विचारांची शिकवण मिळते. वारी करणे म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. परमेश्वराची सेवा करताना ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक लागत नाही. त्यामुळे वारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार झालेले असते. यामध्ये सामील झालेल्या वारक-यांमध्ये भगवंत स्वत: ऊर्जा निर्माण करून देतो.
अशोक जाधव म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये अखंडित वारी आणि मनोभावे विठ्ठलाची सेवा करणाºया वारकºयाचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात येतो. ह.भ.प. मंगला फुके या अतिशय समर्थपणे ५०० लोकांची दिंडी चालवत आहे. अनेक वर्षे वारकरी संप्रदायाची परंपरा त्या पार पाडत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. दिपक काळे यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व जाधव यांनी आभार मानले.