पुणे-पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए)यांच्या तर्फे आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात डेक्कन इलेव्हन अ, बीईजी या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
बीईजी येथील फुटबॉल मैदानवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन इलेव्हन अ संघाने संगम यंग वन्स संघाचा २-० असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच डेक्कन इलेव्हन संघाच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण स्वीकारले. ८व्या मिनिटाला डेक्कन इलेव्हन संघाच्या जीवन नलगे याने चेंडूचा ताबा मिळाल्यानंतर शुभम बिबवेकडे पास दिला. शुभम बिबवे याने चेंडू नियंत्रित केला व मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर संगम संघाने जम बसवायला सुरुवात केली. संगमच्या सोमेश सिंग, आरिष शेख यांना संघाला आघाडीवर नेण्याची संधी मिळाली होती, पण डेक्कन इलेव्हन संघाची बचावफळी भेदू शकली नाही. १२व्या मिनिटाला लिऑन नायर याने दिलेल्या पासवर साहिल भोकरे याने संधी साधत गोल नोंदवून डेक्कन इलेव्हन संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हि स्थिती कायम होती. उत्तरार्धातील खेळ सुरु झाल्यानंतर संगम यंग वन्सला आघाडीची प्रतीक्षा राहिली. अमेय तलगांवकर, सोमेश सिंग यांनी डेक्कन इलेव्हनच्या गोलकक्षात वेळोवेळी धडक मारत होते, परंतु प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश येत होते. डेक्कन इलेव्हनने बचावावर जास्त लक्ष केंद्रित करताना संगम यंग वन्सची आक्रमणे सफल ठरणार नाही याकडे लक्ष दिले. सामन्याच्या शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत डेक्कन इलेव्हन अ संघाने संगम यंग वन्स संघावर २-० असा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात बीईजी संघाने डेक्कन रोव्हर्स अ संघाचा ८-० असा धुव्वा उडविला. बीईजी कडून प्रेमानंद सिंग(३,१५,७०,८५मि.) याने चार गोल, सिमॉन अॅनलने दोन गोल, तर रिठा अॅनल आणि आर.जे.सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डेक्कन इलेव्हन अ: २(शुभम बिबवे ८मि.पास-जीवन नलगे, साहिल भोकरे १८मि.पास-लिऑन नायर)वि.वि.संगम यंग वन्स: ०;
बीईजी: ८(प्रेमानंद सिंग ३,१५,७०,८५मि.,सिमॉन अॅनल ११, ७९मि.,रिठा अॅनल ३०मि.,आर.जे.सिंग ३७मि.)वि.वि.डेक्कन रोव्हर्स अ: ०.